देशभरात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढता धोका लक्षात घेऊन देशातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध ३१ मे २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे.

शुक्रवारी डीजीसीएकडून याबाबत माहिती देण्यात आली. यानुसार आंतराराष्ट्रीय विमान उड्डाणे येत्या ३१ मेपर्यंत थांबवण्यात आले आहेत. भारतामधून जाणाऱ्या तसेच येणाऱ्या विमानांवरील बंदी ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र कार्गो फ्लाईट्ससाठी हा नियम लागू नसेल. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील निर्बंध आंतरराष्ट्रीय ऑल-कार्गो ऑपरेशन आणि उड्डाणांवर लागू राहणात नाहीत. तसेच, काही निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवरच विशेष कारणासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सक्षम प्राधिकाऱ्यांच्यामार्फत परवानगी दिली जाऊ शकते, असं डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने पहिल्यांदा गेल्या वर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर निर्बंध आणले होते. तेव्हापासून डीजीसीएकडून वेळोवेळी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जात आहेत. दुसरीकडे, भारताने २८ देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, युएई, केनिया, भूतान, फ्रान्स, श्रीलंका यांसारख्या देशांचा समावेश आहे. एअर बबल करारानुसार संबंधित देशांमध्ये उड्डाणांचे संचलन करता येते.