देवीयो और सज्जनो… आम्हाला खात्री आहे हे दोन शब्द तुम्ही त्याच टोनमध्ये वाचले असणार. पण सामान्यपणे हे दोन शब्द वाचल्यानंतर डोळ्यासमोर येणार चेहरा म्हणजे महानायक अमिताभ बच्चन. आपल्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमामध्ये घराघरामध्ये पोहचलेला अमिताभ यांचा आवाज आता थेट अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. होय खरोखरच आता अमिताभ यांचा आवाज अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सावर ऐकायला मिळणार आहे.

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज अशा अ‍ॅमेझॉनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत करार केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या व्हॉइस असिस्टंट सर्व्हिसने अ‍ॅमेझॉन अलेक्सासाठी पहिल्यांदाच भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड केली आहे. ‘बच्चन अलेक्सा’ असे या नविन फीचरचे नाव ठेवण्यात आले आहे.

‘बच्चन अलेक्सा’ 2021 पासून ग्राहकांना वापरता येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात जोक, हवामानासंदर्भात माहिती आणि कविता ऐकता येणार आहेत. यासाठी ग्राहकांना काही रक्कम भरावी लागणार आहे. “Alexa, say hello to Mr. Amitabh Bachchan” या व्हाइस कमांडच्या मदतीने ही सुविधा अ‍ॅक्टीव्हेट करता येणार आहे.

टेक्नॉलॉजीमुळे मला नेहमीच नविन गोष्टींसोबत जोडण्याची संधी दिली आहे. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आणखी लोकांपर्यंत मला पोहोचता येईल याचा मला विशेष आनंद आहे, असं या कराराबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं.