अनेक लोकांना संतापावर नियंत्रण ठेवणे अवघड असते. ते अनेकदा या ना त्या कारणावरून जमदग्नीचा अवतार धारण करतात तर काही कितीही काहीही घडले तरी शांत असतात. जे लोक संताप आवरू शकत नाहीत त्यांना त्यानंतरच्या दोन तासांनी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता पाचपटींनी अधिक असते, असे हार्वर्डच्या संशोधनात म्हटले आहे.
सांख्यिकीय विश्लेषणानुसार सहा हजार हृदयविकार व पक्षाघाताच्या घटना या संतापाच्या उद्रेकानंतर अवघ्या दोन तासांत घडून आल्या आहेत. यात इतर वेळेपेक्षा हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण यात ४.७४ टक्के अधिक असते तर पक्षाघाताचे प्रमाण ३.६२ टक्के अधिक असते. हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते अति संतापाने रक्तदाब वाढून हृदयविकाराचे झटके मोठय़ा प्रमाणावर येतात, कारण या लोकांना स्वत:वर संयम ठेवता येत नाही असे ‘द टाइम्स’ने या संशोधनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
लोकांना शांत करण्यासाठी मानसशास्त्रीय उपचार असतात, पण त्याचा वापर हृदयविकारावरील बिटा ब्लॉकर औषधांसमवेत केला जात नाही असे दिसून आले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील आरोग्य विभागाच्या संशोधक एलिझाबेथ मस्टोफस्की यांनी सांगितले, की संतापाच्या तुलनेने सौम्य अशा आवर्तनात हृदयविकाराची शक्यता कमी असली तरी संतापाची वारंवार आवर्तने होत राहिल्यास हृदयविकाराची शक्यता वाढते.
या लोकांना अगोदरच हृदयविकाराचा व मधुमेहाचा तसेच पक्षाघाताचा त्रास असतो, पण संतापामुळे त्याचा परिणाम दुपटीहून अधिक वाढतो व तो एक जोखमीचा घटक बनतो. ज्या व्यक्तीला महिन्यातून एकदाच काही प्रमाणात संताप येतो त्या व्यक्तीला तुलनेने हृदयविकार व पक्षाघाताचा धोका कमी असतो व जे लोक वारंवार संतापी असतात त्यांच्यात हे प्रमाण जास्त असते.
कमी संतापणे व जास्त संतापणे यात फारसा फरक नसतो, त्यामुळे संतापाचा परिणाम आरोग्यावर होतच असतो असे त्यांचे म्हणणे आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.