एका रोगावर उपचार करावयास जावे आणि त्यांनी भलताच रोग बरा व्हावा, असे काहीसे नव्या संशोधनामुळे झाले आहे. कर्करोगावरील उपचारार्थ शोधण्यात आलेल्या नव्या औषधामुळे रक्तात दडून बसलेले एचआयव्ही विषाणू सहज सापडणे शक्य होणार आहे. कर्करोगावरील रोमिडेप्सीन या औषधांमुळे, एचआयव्ही विषाणूंची रक्तातील संख्या दोन ते चार पटीने वाढते आणि रक्तात हा विषाणू शोधणे सहज शक्य होते, असे नव्या संशोधनात दिसून आले आहे.
डेन्मार्क येथील आऱ्हस विद्यापीठ आणि आऱ्हस वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पॅनोबिनोस्टॅट हे औषध पेशींमध्ये दडून बसलेल्या एचआयव्ही विषाणूंना सक्रिय करू शकते, असे संशोधन प्रसिद्ध केले होते. मात्र रक्तातील एचआयव्ही विषाणूंच्या संख्येत झालेली वाढ प्रचलित पद्धतींनी शोधणे प्रथमच शक्य झाले आहे.
प्रक्रिया नेमकी काय?
मानवी शरीराच्या प्रतिकारक क्षमतेसाठी कार्यरत असणाऱ्या सीडी – ४ या पेशींमध्ये हे विषाणू दडलेले असतात. मात्र या पेशी रोगप्रतिकारक असूनही या विषाणूंशी लढू शकत नाहीत. गंमत म्हणजे ज्या टी पेशी या विषाणूंशी लढू शकतात त्या पेशींना सदर विषाणू शोधणे शक्य होत नाही.
नव्या संशोधनाची परिणिती
विषाणू नष्ट करण्याची क्षमता असलेल्या पेशींना तो शोधता न येणे आणि नष्ट न करण्याची क्षमता असलेल्या पेशींना तो सापडणे या समस्येवर पॅनोबिनोस्टॅट आणि कर्करोगावरील रोमिडेप्सीन या औषधांनी मात केली आहे. त्यामुळे सदोष सीडी – ४ रक्तपेशी शोधणे टी-पेशींना सहज शक्य होते, असे नव्या संशोधनात पुढे आले आहे.