23 January 2020

News Flash

प्रतिरोध टाळण्यासाठी कोलिस्टिन वापरावर निर्बंध

सध्या कोलिस्टिन हे प्रतिजैविक म्हणून वापरले जाते.

मानवामध्ये वापरल्या जाणाऱ्या बहुतेक प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिरोध निर्माण झालेल्या जिवाणूंवर रामबाण इलाज म्हणून सध्या कोलिस्टिन हे प्रतिजैविक वापरले जाते. याच कोलिस्टिनचा दुग्धजन्य आणि मांसजन्य प्राण्यांमधील उपचारांसाठी बेसुमार होऊ लागल्याने त्याविरुद्ध मानवात प्रतिरोध निर्माण होण्याची भीती लक्षात घेता, यापुढे भारतात कोलिस्टिनचा प्राणी-मत्स्यपालनात प्रतिबंधात्मक उपचारांसाठी वापर करण्यास बंदी घालणारा आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने जारी केला आहे.

त्यानुसार, मांसजन्य आणि दुग्धजन्य प्राण्यांमध्ये तसेच कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि पशुखाद्यासाठी कोलिस्टिन आणि कोलिस्टिनचा समावेश असलेल्या इतर औषधांचा प्रतिबंधात्मक वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा वापरासाठी कोलिस्टिनची निर्मिती, विक्री आणि पुरवठा करण्यावरही बंदी घातलेली आहे. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४० मधील तरतुदीनुसार ही बंदी घातली असून तशी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.

कोलिस्टिन हे प्रतिजैविक आणि त्याचा समावेश करून तयार केलेल्या इतर औषधांचा प्राणी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि पशुखाद्यासाठी वापर केल्याने त्याचा मानवी उपचारांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते, असे अधिसूचनेत नमूद केले आहे. त्याची दखल घेत औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (डीटीएबी) सरकारकडे कोलिस्टिनच्या प्राण्यांमधील वापरावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. ती लक्षात घेता व्यापक मानवी हितासाठी कोलिस्टिनच्या प्राण्यांमधील वापरावर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रामुख्याने कुक्कुटपालन व्यवसायात कोंबडय़ांच्या वाढीसाठी कोलिस्टिनचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर होत होता, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

First Published on July 22, 2019 1:13 am

Web Title: antibiotics colistin mpg 94
Next Stories
1 लाल वाइनमधील संयुग स्नायूंसाठी उपयुक्त
2 गुगल मॅपवर पब्लिक टॉयलेटही शोधता येणार
3 Twitter लॉगिन केल्यास व्हाल अचंबित, डिझायनमध्ये झाला ‘हा’ बदल
Just Now!
X