प्रतिजैविकांच्या अति वापरामुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशींचे रक्षण करणारे आणि संसर्गाला अटकाव करणारे ‘चांगले’ जिवाणू नष्ट होतात असा इशारा भारतीय वंशाच्या संशोधकानी दिला असून प्रतिजैविकांच्या वापरामुळे फायद्याहून नुकसान जास्त असल्याचे म्हटले आहे.

हा अभ्यास फ्रन्टिंयर इन मायक्रोबायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला असून संसर्गाला विरोध करणाऱ्या शरीराच्या नैसर्गिक सुरक्षाप्रणालीवर प्रतिजैविकांचा परिणाम होत असल्याचे या अभ्यासात संशोधकांना आढळले आहे.

अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझव्‍‌र्ह विद्यापीठातील संशोधक नटराजन भास्करण आणि शिवानी बुटाला यांनी शरीरातील जिवाणू आणि त्यांचा तोंडातील संसर्गाला विरोध करणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला. त्यांनी ट्रेग्ज आणि टीएच-१७ या पेशी कॅनडीडा यासारख्या बुरशीजन्य संसर्गाविरोधात किती परिणामकारक आहे हे पाहिले. बुरशीजन्य संसर्गाचा विरोध करणारे जिवाणू नसल्यास काय होते हे तापासण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे केस वेस्टर्न येथील साहाय्यक प्राध्यापिका पुष्पा पांडिया यांनी म्हटले. प्रतिजैविकांमुळे शरीरातील चांगल्या जिवाणूंमुळे तयार होणारे चरबीयुक्त आम्ल नष्ट होत असल्याचे आम्हाला आढळले. असे असले तरीही प्राणघातक संसर्गाविरोधात प्रतिजैविके आवश्यक असल्याचे पांडिया यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मौखिक आरोग्य आणि एकदंर आरोग्याचा संबंध असल्याचे आम्हाला वाटत आहे.

इतर प्रकारच्या संसर्गामध्ये शरीरातील जिवाणूंच्या संरक्षणात्मक प्रभावांवर या अभ्यासाचा व्यापक प्रभाव पडून शकतो, असेही पांडिया यांनी म्हटले.