अनेकजण चिकनवर आवडीने ताव मारत असले तरी दिल्लीतील एनसीआर भागातील कुक्कुटपालन केंद्रामध्ये कोंबडय़ांमध्ये प्रतिजैविकाचे अंश सापडले आहेत असे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हरॉन्मेंट या संस्थेने म्हटले आहे. कोंबडय़ांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांमुळे भारतीय लोकांमध्ये आता प्रतिजैविकांचा सकारात्मक परिणाम दिसेनासा झाला आहे. किंबहुना सोप्या शब्दात कुठलाही रोग झाल्यास प्रतिजैविके घेतल्यानंतर माणसांमध्ये त्याचा परिणाम होत नाही अशी स्थिती आहे.
सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हरॉन्मेंट या संस्थेने कुक्कुटपालन उद्योगात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त प्रतिजैविके वापरण्याबाबत आग्रह धरला गेला पाहिजे कारण अति प्रतिजैविकांमुळे माणसांचाही जीव धोक्यात येत आहे. दिल्लीतील एनसीआर भागातून ७० कोंबडय़ांचे नमुने घेतले असता त्यात नेहमी वापरली जाणारी सहा प्रतिजैविके आढळून आली. त्यातील ४० टक्के नमुन्यात प्रतिजैविके आढळून आली तर १७ टक्के नमुन्यात एकापेक्षा अधिक प्रतिजैविके आढळून आली आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हरॉन्मेंट या संस्थेने सांगितले की, भारतीयांमध्ये प्रतिजैविकांविरुद्ध विरोधक्षमता वाढत आहे व त्यामुळे एरवी सहज बरे होणारे रोग माणसांमध्ये बरे करण्याकरिता खूप वेळ लागत आहे. कुक्कुटपालन उद्योगात  वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांमुळे हे घडून येत आहे कारण त्यांचा या उद्योगातील वापर अर्निबध आहे. नवी दिल्ली येथील संशोधनानुसार माणसात सिप्रोफ्रॉक्सॅसिन हे प्रतिजैविक वापरले जाते तेच कुक्कुटपालन व्यवसायात मोठय़ा प्रमाणात वापरले जाते त्यामुळे या प्रतिजैविकाची जीवाणूंना मारण्याची क्षमता कमी झाली आहे.  कुक्कुटपालन उद्योगात प्रतिजैविकांचा वापर हा वाढोत्तेजक म्हणजे कोंबडय़ांची वाढ वेगाने व्हावी म्हणून केला जातो. कोंबडय़ांना कीटकनाशके खाऊ घातली जातात त्यामुळे त्यांचे वजनही वाढते व वाढही वेगाने होते असे सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हरॉन्मेंट (सीएसई)  या संस्थेच्या महासंचालिका सुनीता नारायण यांनी सांगितले.
भारतात कुक्कुटपालन उद्योगात प्रतिजैविकांच्या वापराबाबत निर्बंध नाहीत व विक्रीवरही र्निबध नाहीत. त्यामुळे कोंबडय़ांना प्रतिजैविके खाऊ घातली जातात. दिल्ली व एनसीआर भागात चाचण्या करताना दिल्लीतून ३६ तर नोईडातून १२ नमुने घेण्यात आले होते. गुरगावमधून आट, फरिदाबाद व गाझियाबादमधून प्रत्येकी सात नमुने घेण्यात आले होते. स्नायू, यकृत व मूत्रपिंड तपासले असता त्यात ऑक्सिटेट्रासायक्लिन, क्लोरटेट्रासायक्लिन व डॉक्सिसायक्लिन, एन्रोफ्लॉक्सिन व सिप्रोफलॉक्सिन व निओमायसिन ही प्रतिजैविके सापडली. त्यांचे प्रमाण प्रतिकिलो चिकनमध्ये ३.३७ ते १३१.७५ मायक्रोग्रॅम होते. ४० टक्के नमुन्यात आक्षेपार्ह प्रतिजैविके सापडली. २२.९ टक्के नमुन्यात एका प्रतिजैविकाचा समावेश होता तर १७.१ टक्के नमुन्यात एकापेक्षा जास्त  प्रतिजैविके सापडली.
खा आणि परिणाम भोगा..!
*कोंबडय़ांमधील प्रतिजैविके जीवाणूंना निष्प्रभ करू शकत नाहीत
*कोंबडय़ातील जिवाणू चिकनच्या सेवनाने माणसात येतात.
*प्रतिजैविकेही माणसात येऊन जीवाणू त्यांना जुमानेसे होतात.
*भारतात सिप्रोफ्लॉक्सॅसिनचा मोठय़ा प्रमाणात वापर.
*क्षय, न्यूमोनिया, आतडय़ाचे रोग बरे करण्यात अडथळे.
*कोंबडय़ांच्या ३५ ते ४२ दिवसांच्या जीवनक्रमात त्यांना प्रतिजैविके  मोठय़ा प्रमाणावर दिल्याने ती निष्प्रभ ठरतात.