दीर्घकाळ प्रतिजैविकांचे सेवन केल्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे.
जर्मनीतील मॅक्स डेलब्रुक सेंटर फॉर मोलेक्युलर मेडिसिनमधील सुझान वुल्फ यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या गटाने या संदर्भात केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘सेल रिपोर्ट््स’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
त्यानुसार एका विश्ष्टि प्रकारच्या प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशी मेंदू आणि पोटातील जिवाणूंमध्ये मध्यस्थ म्हणून काम करतात आणि त्यामुळे मेंदूच्या कार्यप्रणालीवर फरक पडतो. ‘एलवाय ६ सी (एचआय) मोनोसाइट्स’ असे या पेशींचे नाव असून त्या चेतासंस्थेतील नवीन पेशी निर्माण करण्याच्या प्रक्रियेत (न्यूरोजेनेसिस) महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही उंदरांवर प्रयोग केले. काही उंदरांना मोठय़ा प्रमाणावर प्रतिजैविक औषधे देऊन त्यांच्या पचनसंस्थेतील नैसर्गिक जिवाणूंना संपवण्यात आले. त्यानंतर त्या उंदरांमधील नव्या चेतापेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावल्याचे तसेच त्यांची स्मरणशक्ती क्षीण झाल्याचे आढळून आले. यानंतर त्यांच्या शरीरात बाहेरून ‘एलवाय ६ सी (एचआय) मोनोसाइट्स’ या पेशी सोडण्यात आल्यावर मेंदूचे कार्य सुधारल्याचे दिसून आले. तसेच फिरत्या चाकावर पळण्याचा व्यायाम दिल्यानंतरही काही उंदरांच्या मेंदूचे कार्य सुधारल्याचे दिसले.
हेच निष्कर्ष मनुष्यप्राण्यांसाठीही लागू होतात. मात्र माणसात सर्वच प्रतिजैविकांमुळे हा परिणाम दिसून येतो असे नाही. या अभ्यासामुळे शास्त्रज्ञांना न्यूरोजेनेसिस प्रक्रियेत पोटातील जिवाणूंची आणि ‘एलवाय ६ सी (एचआय) मोनोसाइट्स’ पेशींची महत्त्वाची भूमिका लक्षात आली. प्रतिजैविकांच्या दीर्घकाळ सेवनाने स्किझोफ्रेनिया आणि डिप्रेशनसारख्या विकारांनी पीडित रुग्णांच्या मेंदूच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. त्यावर उपाय शोधण्यासाठीही या संशोधनाचा उपयोग होईल.