मानवाच्या सर्वात जवळचा असणाऱ्या चिम्पांझीमध्ये देखील माणसासारखी भावनिक देवाण-घेवाण होत असल्याचे एका नव्या अभ्यासामधून समोर आले आहे.
आफ्रिकेतील एका अभयारण्यामध्ये चिंम्पांझीच्या पिल्लांवर संशोधन करत असलेल्या संशोधकांनी चिंम्पांझी आणि मानवी मुलांमधील भावनिक साधर्म्य शोधले आहे. चिंम्पांझीच्या पिल्लांमध्ये देखील मानवी मुलांप्रमाणेच भावनांचे नियमन चालत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.      
मानवी उत्त्क्रांतीच्या इतिहासाच्या दृष्टीकोनामधून हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या अभ्यासामुळे मानवी मुलांसाठी वापरण्यात येणाऱ्या सामाजिक व भावनिक संरचनेचा चिंम्पांझींच्या पिल्लांच्या भावनिक संवर्धनासाठी उपयोग होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या संरचनेमुळे चिंम्पांझीच्या अभिव्यक्तिचा अभ्यास करता येणार आहे.
इमोरी विद्यापीठ, यर्केस राष्ट्रीय आदिम संशोधन केंद्रातील लिव्हींग लिंक्स सेंटरचे झाना क्ले आणि फ्रान्स डी वॉल यांनी कांगो खोऱ्यातील किनशासा येथील चिम्पांझींसाठी प्रसिध्द असलेल्या अभयारण्यामध्ये हे संशोधन केले.
क्ले व वॉल यांनी अभयारण्यामधील चिंम्पांझींच्या रोजच्या सामाजिक जीवनाच्या छायाचित्रण करून त्याचे विश्लेषण केले. या विश्लेषणामधून चिंम्पांझीमध्ये होणाऱ्या भावनांच्या देवाण-घेवाणीच्या पध्दतींची मोजदाद करण्यात आली. चिंम्पांझीमधील भांडण, रूसण्यातील भावनिक देवाण-घेवाणींमध्ये सहजता व गती असल्याचे संशोधकांच्या निरिक्षणांमधून समोर आले आहे.
“या अभ्यासामुळे मानव आणि त्याच्या पूर्वजांमधील साधर्म्याचा अभ्यास करता येणार आहे. त्यांच्यातील मानसशास्त्रीय साधर्म्यामुळे ६० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला या दोघांचा शेवटचा सामाईक पूर्वज कोण याचा अभ्यास करणे सोपे जाणार आहे,” असे डी वॉल म्हणाले.  
नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रसिध्द करण्यात आला आहे.