अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या Apple कंपनीने 1976 साली आपल्या पहिल्या वहिल्या कंप्युटरची निर्मिती केली होती. त्यानंतर कंपनीने ‘Apple-1’ या नावाने अशा 200 कंप्युटर्सची निर्मिती केली. नुकताच Apple ने या अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान असलेल्या संगणकांचा ऑनलाइन लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, अॅपलच्या या पहिल्या कंप्युटरची तब्बल 37100 पौंड म्हणजेच जवळपास 3.2 कोटी रूपयांना विक्री करण्यात आली आहे. लंडनमधील ‘ख्रिस्ती ऑक्शन हाऊस’मध्ये या कंप्युटरचा लिलाव करण्यात आला.

‘Apple-1’ 1976 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यावेळी त्याची किंमत 525 पौंड इतकी होती. नुकत्याच लिलाव करण्यात आलेला ‘Apple-1’ मध्ये MOS टेक्नॉलॉजी, 6502 मायक्रोप्रोसेसर आणि 8 केबीची रॅम देण्यात आली होती. पूर्णत: असेंबल्ड मदरबोर्डसोबत येणारा हा पहिला पर्सनल कंप्युटर होता. सुरूवातीला 200 ‘Apple-1’ कंप्युटर तयार करण्यात आले होते. लिलाव करण्यात आलेल्या ‘Apple-1’ कंप्युटरसोबत मॅन्युअल प्रिंटर, मॉनिटर आणि किबोर्डचादेखील समावेश आहे. प्रोग्राम डेव्हलप करण्यापासून बेसिक कामकाजासाठी हा कंप्युटर पॉवरफुल मानला जातो.

‘Apple-1’ सिस्टिमसोबत त्यावेळी केसिंग, पावर सप्लाय, की-बोर्ड किंवा मॉनिटर नव्हता. मात्र यासोबत प्री-असेंबल मदरबोर्ड होता, त्यामुळे हा कंप्युटर इतरांपेक्षा वेगळा ठरला. या कंप्युटरची किंमत सुरुवातीला 525 पौंड एवढी ठेवण्यात आली होती. 1977 मध्ये किंमत कमी करुन 475 पौंड ठेवण्यात आली. 1977 च्या अखेरीस (10 जून 1977)कंपनीने ‘Apple-2’ या कंप्युटरची निर्मिती केली. त्यानंतर मात्र कंपनीने पहिल्या कंप्युटरच्या निर्मितीवर जास्त लक्ष दिले नाही आणि अखेर ऑक्टोबर 1977 मध्ये जॉब्स आणि वोजनियाक यांनी ‘Apple-1’ चे उत्पादन बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. यानंतर ज्या ग्राहकांनी ‘Apple-1’ ची खरेदी केली होती, त्यांना ते कंप्युटर पुन्हा कंपनीला परत करण्याचा आग्रह कंपनीकडून करण्यात आला. त्यासाठी काही ऑफर्स देखील कंपनीकडून देण्यात आल्या होत्या. ‘Apple-1’ च्या ज्या मालकांनी आपले कंप्युटर्स कंपनीला परत केले ते नष्ट करण्यात आले, तर अर्ध्याहून अधिक कंप्युटर्स कंपनीकडे परत आलेच नाहीत.