Apple September Event 2018 Live Updates : टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. असाच एक खास इव्हेंट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पार पडला. आयफोन X च्या प्रचंड यशानंतर अॅपलने आज आयफोन Xs, आयफोन Xs Max आणि आयफोन Xr असे तीन आयफोन अॅपल कंपनीने लाँच केले आहेत. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी या फोनचे लाँन्चिग केले. कॅलिफॉर्नियातील अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स सभागृहामध्ये नवीन आयफोनचे अनावरण करण्यात आले. तीन नव्या आयफोनसह अॅपलची वॉच सीरिज ४ ही लाँच करण्यात आली आहे. नव्या अॅपल वॉच ४ मध्ये तीन नवे 'हार्ट फिचर' दिले गेले आहेत. लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी अशी ही तीन वैशिष्ट्ये आहेत. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅपल कंपनीने यावर्षी नवे फिचर आणि बरेच काही दिले आहे. यामध्ये ड्युल सिमची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता भारतात अॅपल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे मत आहे. काल बुधावारी रात्री साडेदहा वाजता झालेल्या मेगा इव्हेंटमधील क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट वाचा..