Apple कंपनीने आज (मंगळवारी) एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलं आहे. न्यू यॉर्कच्या ब्रुकलिन अॅकेडमी ऑफ हॉवर्ड गिलमॅनच्या ओपेरा हाउसमध्ये हा इव्हेंट आयोजित करण्यात आला असून अॅपलच्या अधिकृत संकेतस्थळावरही हा इव्हेंट लाइव्ह पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता हा इव्हेंट सुरू होईल. यामध्ये सात नवी उपकरणं सादर केली जाण्याची अपेक्षा आहे. जाणून घेऊया कोणती नवी उपकरणं अॅपल लॉन्च करु शकतं.

-न्यू आयपॅड प्रो (New iPad Pro) – अपेक्षा आहे की या इव्हेंटमध्ये अॅपल आयपॅडचं नवं व्हर्जन लॉन्च होऊ शकतं. नव्या आयपॅडमध्ये होम बटन नसेल असंही समजतंय.

-आयपॅड मिनी (iPad Mini)- काही रिपोर्ट्सनुसार, या इव्हेंटमध्ये कंपनी आयपॅड मिनीचं एक नवं व्हर्जन लॉन्च करणार आहे. या टॅबलेटचं शेवटचं अपडेट तीन वर्षांपूर्वी आलं होतं.

-एअर पावर (Air Power) -अॅपल आज वायरलेस चार्जिंग मॅट लॉन्च करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच कंपनीने आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंगचं फिचर दिलं होतं. परिणामी या इव्हेंटमध्ये कंपनी एअर पावर वायरलेस चार्जिंग मॅट लॉन्च करण्याची शक्यता आहे.

-मॅक (Mac) – अॅपलच्या मॅक लाइनअपचंही या इव्हेंटमध्ये अपडेट जारी केलं जाऊ शकतं. याचं नवं व्हर्जन लॉन्च होऊ शकतं, आणि जुन्या मॅकसाठी अपडेट येऊ शकतं अशी चर्चा आहे. 2015 नंतर मॅकबुक एअरमध्ये कोणतंही नवं अपडेट आलेलं नाही. नवं मॅकबूक एअर लॉन्च करण्यात आल्यास त्याची किंमत पहिल्यापेक्षा कमी असू शकते.

-मॅक मिनी (Mac Mini) -अॅपल मॅक मिनी डेस्कटॉपसाठी नवं अपडेट आणण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षांपासून अॅपल मॅक मिनीच्या अपडेटवर गेल्या चार वर्षांपासून मेहनत घेत आहे, त्यामुळे याचं अपडेट आल्यास ते उत्कृष्ठ असेल अशी अपेक्षा आहे.

-एअर पॉड्स 2 (AirPods 2) -कंपनीने वायरलेस ईअरफोन्स एअर पॉड्स 2016 मध्ये लॉन्च केले होते. यंदा लॉन्च केले जाणारे नवे एअर पॉड्स वॉटरप्रूफ असतील.

-होम पॉड 2 (Home Pod)-होम पॉडच्या बाबतीत अद्याप खास माहिती मिळालेली नाही. अॅपलने गेल्या वर्षी होम पॉड लॉन्च केले होते. होम पॉड म्हणजे एक स्मार्ट स्पीकर आहे आणि याची थेट टक्कर अॅमेझॉन इको आणि गुगलच्या गुगल होम स्पीकर्स यांच्याशी आहे. या दोन्ही कंपन्यांना अजून तगडं आव्हान देण्यासाठी अॅपल आपल्या होम पॉडसाठी काही अपडेट जारी करु शकते.