आयफोन वापरणे हे आजही स्टेटस सिंबॉल समजले जाते. आयफोनचा चाहतावर्ग मोठा असून अनेक वर्षांपासून याच कंपनीचा फोन वापरणारे लोक आपल्या आजुबाजूला असतात. पण मागच्या काही काळात अँड्रॉईडमध्ये ड्युएल सिमकार्डची सुविधा आल्यानंतर अनेक जण अॅपलकडून इतर कंपन्यांकडे वळले. मात्र आता या सगळ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत असल्याचे नुकतेच समजले आहे. याआधीही बऱ्याचदा अॅपल आपल्या नवीन मॉडेलमध्ये ड्युएल सिमची सुविधा देणार अशी चर्चा होती, मात्र आता ते प्रत्यक्षात आले आहे.

iPhone X plus आणि एलसीडी डिस्प्लेसोबत येणाऱ्या इतर फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा असेल असे सांगण्यात येत होते. अॅपल कंपनी ही सुविधा खास आशियायी बाजारपेठेसाठी आणू शकते. ड्युएल सिम मोबाईलमुळे भारतात अॅपलचा मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येत साधारण २ टक्क्यांनी वाढ होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

यावर्षी कंपनी नवीन ३ मॉडेल लाँच करणार आहे. यातील एक फोन लो बजेट असेल. iPhone X या फोनला ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. याबरोबरच आताच्या फोनप्रमाणेच ५.८ इंचाचा डिस्प्ले असलेले iPhone X चे आणखी एक व्हर्जन दाखल होईल. याशिवाय सर्वात महागडा असलेला iPhone X plus हा ६.५ इंचाच्या ओएलईडी स्क्रीनसोबत येईल. आयफोनच्या या तिन्हीही व्हर्जनला पुढच्या बाजूने फेस आयडीचे फिचर असेल. असे असले तरीही या फोनच्या उत्पादनाला काहीसा वेळ लागत असल्याने त्याची प्रत्यक्ष विक्री ऑक्टोबर ते नोव्हेंबरनंतर सुरु होईल. त्यामुळे या नव्या फिचरसह येणाऱ्या आयफोनची ग्राहकांना मोठी उत्सुकता आहे.