गेल्यावर्षी अॅपलनं आपला सर्वात महागडा iPhone X हा फोन लाँच केला. अद्यावत तंत्रज्ञानानं युक्त असलेल्या या फोनमधल्या फेस रिकग्नेशन फीचरनं त्याला वेगळी ओळख दिली. पण, लाँच केल्यानंतर अॅपलच्या या महागड्या फोनला अपेक्षित असा प्रतिसाद न लाभल्यानं यावर्षात आयफोनX ची विक्री कंपनीकडून थांबवण्यात येईल अशी शक्यता सुप्रसिद्ध विश्लेषक मिंग ची क्युओनं वर्तवली आहे.

सप्टेंबर २०१७ मध्ये अॅपलनं iPhone X आणि iPhone 8 Plus लाँच केले होते. पण, iPhone X ला अपेक्षित प्रतिसाद ग्राहकांकडून लाभला नाही त्यातूनही चिनी ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे कमी होता. आयफोन ८ हा आयफोन X पेक्षाही चिनी ग्राहकांच्या जास्त पसंतीस उतरला असं मिंगनं अॅपलइनसायडरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आणि याच कारणामुळे आयफोन x ची विक्री २०१८ मध्ये थांबवण्यात येईल असं भाकित मिंग यांनी वर्तवलं आहे. यावर्षात अॅपल तीन नवीन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे आणि हे फोन बाजारात दाखल झाल्यानंतर कंपनीकडून रितसर सर्वात मडागड्या फोनचं उत्पादन थांबवण्यात येईल. अॅपलच्या दशकपूर्तीनिमित्त हा फोन लाँच करण्यात आला होता. या फोनची भारतीय बाजारपेठेतील किंमत ८९ हजार रुपये आहे.

मिंगनं नोंदवलेल्या निरिक्षणानुसार फोन लाँच केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आयफोन x ची मागणी जितकी असायला हवी होती त्यापेक्षा त्यात काही पटींनी घट झाली आहे, म्हणूनच हा फोन येणाऱ्या काळात उपलब्ध नसेल असं मिंगच म्हणणं आहे.