स्मार्टफोन मार्केटमध्ये अ‍ॅपल आणि सॅमसंग एकमेकांचे स्पर्धक आहेत. पण खूप कमी जणांना याबाबत माहिती असेल की, अ‍ॅपल आपल्या आयफोन स्मार्टफोन्ससाठी सॅमसंगकडून डिस्प्ले खरेदी करते. पण आता कमी डिस्प्ले खरेदी केल्यामुळे अ‍ॅपलला फटका बसला आहे. ‘डिस्प्ले सप्लाय चेन कन्सल्टंट’च्या (DSCC) रिपोर्टनुसार, यासाठी भरपाई म्हणून अ‍ॅपलने सॅमसंगला जवळपास 950 दशलक्ष डॉलर (जवळपास 7156 कोटी रुपये) दिले आहेत.

सॅमसंग कंपनी अ‍ॅपलला OLED डिस्प्लेचा पुरवठा करते. अ‍ॅपलकडून मिळालेल्या या दंडात्मक भरपाईमुळे सॅमसंगला इतका फायदा झालाय की कंपनीच्या डिस्प्ले बिजनेसचा दुसऱ्या तिमाहीचा रिव्हेन्यू वाढला आहे. पण, अ‍ॅपलने सॅमसंगकडे भरपाई देण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. गेल्या वर्षीही कमी डिस्प्ले खरेदी केल्यामुळे कंपनीने सॅमसंगला 684 दशलक्ष डॉलर दिले होते. यावर्षी करोनामुळे विक्रीत घट झाल्याने अ‍ॅपलच्या आय़फोनची विक्रीही कमी झाली आहे. दरवर्षी एका ठरवीक संख्येत डिस्प्ले खरेदी करण्याचा दोन्ही कंपन्यांमध्ये करार आहे. पण कमी डिस्प्ले पॅनल खरेदी केल्यास अ‍ॅपलला भरपाई द्यावी लागते.

काही रिपोर्ट्समध्ये अ‍ॅपल कंपनी आता सॅमसंगऐवजी दुसरा पुरवठादार शोधत असल्याचंही म्हटलं आहे. चीनच्या BOE टेक्नॉलॉजी ग्रुपसोबत अ‍ॅपलची चर्चा सुरू असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती मिळालेली नाही.