17 February 2019

News Flash

Apple September Event 2018 : ‘अॅपल’च्या पोतडीतून आज काय निघणार, जगभरात उत्सुकता शिगेला

Apple September Launch Event 2018: 2019 मध्ये स्मार्टफोनचं जग कसं बदलणार हे देखील अॅपलच्या या इव्हेंटमधून ठरण्याची शक्यता

तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी अॅपल आज आपले सर्वात लेटेस्ट गॅझेट्स जगासमोर सादर करणार आहे. त्यामुळे आज अॅपलच्या पोतडीतून नेमकं काय निघणार याची अॅपलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात अॅपलने स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, कदाचीत त्यामुळेच जगभरातील गॅझेट प्रेमींचही अॅपलच्या या इव्हेंटकडे लक्ष आहे. 2019 मध्ये स्मार्टफोनचं जग कसं बदलणार हे देखील अॅपलच्या या इव्हेंटमधून ठरण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडे दहा वाजता कॅलिफॉर्नियातील अ‍ॅपलच्या स्टिव्ह जॉब्स सभागृहामध्ये कंपनीचा वार्षिक इव्हेंट होणार आहे. यामध्ये नव्या आयफोनशिवाय अनेक गॅझेट्स लॉन्च होण्याची शक्यता आहे.

आयफोन ८ आणि ८ प्लसची नवलाई संपली नाही, तोच त्याची नवी सुधारीत श्रेणी अ‍ॅपल घेऊन येत आहे. एकाच वेळी तीन आयफोन, मॅकबुक एअर-२, अ‍ॅपल वॉच-४, एअरपॉड-२, नव्या फेस-आयडी या तंत्रज्ञानासह आयपॅड आणले जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे हे आयफोन डय़ुएल सिम सुविधेसह येत आहेत.तीनही आयफोनचे डिस्प्ले मोठे असतील. यात ५.८ इंच आयफोन एक्सएस, ६.१ इंच आयफोन एक्ससीसोबतच, ६.५ इंच आयफोन एक्सएस मॅक्स किंवा प्लस या नावाने हे आयफोन आणले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आयपॅड प्रो १२.९ ची या सालातील नवी आवृत्ती येत आहे. आयओएस १२ चिपसेटच्यासोबत हे सगळे आयफोन असतील.

या नवीन आयफोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अ‍ॅपलची ओळख असलेले फिंगरप्रिंट सेन्सर त्यात नसेल. त्याजागी फेस आयडी सेन्सर असेल. अ‍ॅपलचे आयफोन पहिल्यांदाच डय़ुएल सिममध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अ‍ॅपलमध्ये असणारे प्रोसेसर आणि रॅम हे आधीच्या आयफोनच्या तुलनेत मोठय़ा क्षमतेचे असणार आहेत. आयफोन एक्सएस आणि एक्सएस प्लस याची रॅम चार जीबी किंवा त्यापेक्षा मोठय़ा क्षमतेची असेल.

अ‍ॅपल वॉचची चौथी श्रेणीही प्रस्तुत होत आहे. आधीच्या अ‍ॅपल वॉचपेक्षा मोठी बॅटरी आणि मोठय़ा डिस्प्लेसोबत एलटीई या सुधारीत आवृत्तीसह हे स्मार्ट घडय़ाळ येईल. अॅपल पॉड 2 चे वायरलेस इयरफोन लाँच होण्याचीही शक्यता आहे. हे डिव्हाईस वॉटर रेजिस्टेंट असेल. याशिवाय अॅपल एअरपॉवर या डिव्हाईसचा लूक गेल्यावर्षी लाँच करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी हे नवं डिव्हाईस लाँच केलं जाण्याची अपेक्षा आहे. याबाबत सध्या अॅपलप्रेमींमध्ये वेगवेगळ्या चर्चा आहेत.

लॉन्चिंगपूर्वीच आयफोनच्या किंमती समोर आल्या आहेत. चीनची वेबसाईट Weibo ने याबाबत वृत्त दिले आहे. Weibo या वेबसाईटनुसार iPhone Xcची सुरूवातीची किंमत ६२१०० रुपये असू शकते. तर iPhone Xsची किंमत ७७,९०० आणि  iPhone Xs प्लसची किंमत ८८,४०० असण्याची शक्यता आहे.

First Published on September 12, 2018 1:14 pm

Web Title: apple september event 2018 dual sim new iphone and many gadgets ready to launch
टॅग Apple Event 2018