अमेरिकेची दिग्गज कंपनी अॅपलने गेल्या महिन्यात iPhone XS, iPhone XS Max आणि iPhone XR लॉंच केले होते. यापैकी iPhone XR ची किंमत सर्वात कमी आहे. म्हणजे जर एखाद्याला नवा आयफोन खरेदी करायचाच असेल, पण आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सची लाखाच्या घरात किंमत असल्याने खरेदी करता येत नसेल तर आयफोन एक्सआर हा एक चांगला पर्याय आहे. याची किंमत 76 हजार 900 रुपये आहे.

चार दिवसांपूर्वी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी आयफोन एक्सआरची विक्री सुरू झाली. आता या फोनच्या विक्रीची आकडेवारीही समोर आली आहे. विक्री सुरू होण्याच्या पहिल्याच आठवड्यात अवघ्या चार दिवसांमध्ये आयफोन एक्सआरच्या तब्बल 90 लाख युनिट्सची विक्री झाली. पण तरीही हा आकडा अपेक्षाभंग करणारा आहे असं मत Rosenblatt Securities मधील तज्ज्ञ जुन झॅंग यांनी व्यक्त केलं आहे. आठवड्याच्या अखेरीस याच्या विक्रीला सुरूवात झाल्याने आयफोन एक्सआरच्या 1 कोटी युनिट्सची विक्री होण्याची अपेक्षा बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. आयफोन एक्सआरसाठी झालेली पूर्वनोंदणी आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सपेक्षाही कमी आहे, असा दावा जुन झॅंग यांनी केला आहे. तरीही आयफोन एक्सआरच्या 90 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. दुसरीकडे, आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्स यांच्याकडेही ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

महाग असूनही विक्रमी विक्री होणाऱ्या अ‍ॅपलच्या आयफोनकडे यंदा ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. प्रत्येकवेळी अ‍ॅपलचा नवीन फोन बाजारात आला की त्याला ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद लाभतो. परंतु ग्राहकांकडून फारशी मागणी नसल्याने एक महिन्यानंतरही अनेक दुकानांत नव्या आयफोनचा बराच साठा पडून आहे. गेल्या महिन्यात विक्री सुरू झालेल्या आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सला दोन आठवड्यानंतरही अल्प प्रतिसाद पाहायला मिळाला होता. अनेक दुकानांमध्ये 60 टक्क्यांहून अधिक साठा पडून होता. मात्र, दिवाळीमध्ये आयफोनची मागणी वाढू शकते अशी शक्यताही वर्तवली जात आहे.