अ‍ॅपलच्या चाहत्यांमध्ये iPhone 12 बाबत प्रचंड उत्सुकता आहे. अशातच आता अ‍ॅपल आपल्या आयफोन 12 ला भारतातच मॅन्युफॅक्चर करणार असल्याचं वृत्त आहे. आयफोनच्या या ‘मेड इन इंडिया’ मॉडेलचं प्रोडक्शन बंगळुरूमध्ये होईल. पण, सध्या भारतीयांना मेड इन इंडिया iphone 12 सीरिजच्या स्मार्टफोनसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील वर्षी म्हणजे 2021 च्या मध्यापर्यंत हा मेड इन इंडिया फोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

बिजनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, भारतात आयफोन 12 चं प्रोडक्शन ऑक्टोबर 2020 पासून सुरू होईल. भारतात आयफोन 12 च्या प्रोडक्शनसाठी 2,900 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. भारतात हा फोन बंगळुरूच्या नारसापुरा प्रकल्पात मॅन्युफॅक्चर केला जाईल. भारतात या फोनचं प्रोडक्शन तैवानची Wistron कंपनी करेल. तसेच, या प्रकल्पामध्ये जवळपास 10,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

आयफोन 12 चं भारतात प्रोडक्शन होणार असल्याने या फोनच्या किंमतीवरही परिणाम होईल. त्यामुळे हा फोन गेल्या वर्षी आलेल्या आयफोन 12 च्या तुलनेत स्वस्त असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हा अ‍ॅपलचा भारतातील पहिला प्रकल्प नाहीये. यापूर्वी कंपनीने चेन्नईच्या फॉक्सकॉन प्रकल्पात आयफोन 11 आणि आईफोन XR चं प्रोडक्शन सुरू केलं आहे.

तर, 8 सप्टेंबर रोजी कंपनी ग्लोबल मार्केटमध्ये iPhone 12 लाँच करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, यंदा करोना व्हायरसच्या संकटामुळे iPhone 12 साठी यावर्षी उशीरा लाँचिंग इव्हेंट आयोजित केला जाईल असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.