पालकांनो लक्ष द्या! तुमच्या मुलाने एखादे चांगले काम केले, शाळेत चांगले मार्क मिळवले किंवा दुसऱ्यांना मदत केली तर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारा. त्यामुळे मुलांच्या वागण्यात सुधारणा होण्यासह त्याच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर असल्याचे संशोधकांना आढळले आहे.मुलांची प्रशंसा करणे ही एक सोपी कृती आहे. पालकांकडून मुलाला चांगले काम केल्याचे बक्षीस म्हणून पाठीवर थाप मिळाल्यामुळे मुलांच्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडून येतो. तसेच मुलांच्या वर्तनामध्ये बदल होऊन त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असल्याचे अमेरिकेच्या डी. मॉन्टफोर्ट विद्यापीठातील संशोधक सू वेस्टवुड यांनी म्हटले आहे.

३८ पालक आणि त्यांच्या मुलांचा चार आठवडे सतत अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी हे मत मांडले आहे. पालक मुलांची किती प्रशंसा करतात आणि त्याचा मुलावर किती प्रभाव पडतो, यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती.

जे पालक प्रत्येक दिवशी साधारणपणे पाच वेळा मुलांची स्तुती करतात, त्यांच्या मुलाच्या वागण्यामध्ये सुधारणा होण्यासह त्याचे आरोग्य चांगले राहते. स्तुती करण्यामुळे नेमक्या अयोग्य गोष्टीची माहिती होऊन मुलांचे वागणे सुधारत असल्याचे दिसून आले.

कसलाही खर्च न येता पालकांनी केलेली स्तुती मुलांसाठी योग्य ठरते. मात्र पालकांनी मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टीचीच स्तुती करावी, असेही वेस्टवुड यांनी म्हटले आहे.