स्पर्शभिंग म्हणजे काँटॅक्ट लेन्स वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये डोळ्याचा टाळता येणारा जंतूसंसर्ग आढळून आला असून त्यामुळे प्रसंगी अंधत्व येण्याची शक्यता असते, असे ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. फेरवापराच्या स्पर्शभिंगांमध्ये हा धोका जास्त असतो, कारण ती स्पर्शभिंगे ठेवण्याचे द्रावण अनेकदा जास्त प्रभावी नसते. त्यामुळे डोळ्यात जंतूसंसर्ग होऊन अंधत्व येते. यात पाण्यामुळे स्पर्शभिंगावर जंतू येऊन ते डोळ्यात पसरतात. ब्रिटिश जर्नल ऑफ ऑपथॅलमॉलॉजी या नियतकालिकाने हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. हा संसर्ग फार जास्त लोकांमध्ये आढळत नाही. लाखात अडीच या प्रमाणात हा संसर्ग आग्नेय इंग्लंडमध्ये आढळून आला. पण तो टाळता येण्यासारखा असतो. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्राध्यापक जॉन डार्ट यांनी सांगितले, की लोकांनी स्पर्शभिंगे वापरताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे.

अ‍ॅकॅनथोमिबा केरॅटिटिस हा डोळ्याचा रोग यात होतो व त्यामुळे डोळ्याचा समोरचा भाग म्हणजे कॉर्निया दुखू लागतो व त्याची आग होते. अ‍ॅकॅनथोमिबा हा गाठी तयार करणारा सूक्ष्मजीव आहे त्याचा संसर्ग यात होत असतो. २०११ पासून डोळ्याच्या या संसर्गात तीन पट वाढ झाली आहे. याचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर झाल्यास २५ टक्के किंवा पूर्ण अंधत्व येऊ शकते. त्यात कॉर्निया प्रत्यारोपण हा एकच उपाय असतो पण ते अवघड असते. जे लोक फेरवापराचे स्पर्शभिंग वापरतात त्यांनी ती भिंगे धुऊन वापरावीत, पण त्याआधी हात कोरडे असावेत. पोहताना, चेहरा धुताना व स्नान करताना स्पर्शभिंगे वापरू नयेत.