लग्नसराई आणि सुवर्ण खरेदी शुभ मानल्या जाणाऱ्या दिवाळी व धनत्रयोदशीसारख्या मोठ्या सणांना भारतात सोन्याची मागणी वाढते. काही झालं तरी, आपल्या देशात परंपरेने सोन्याचे दागिने आणि नाण्यांकडे सहज उपलब्ध असलेले घटक म्हणून पाहिले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी उसळलेल्या सोन्याच्या किमतीमुळे त्याची मागणी जरा कमी झाली आहे. रुपयाचे होत असलेले अवमूल्यन सोन्याची किंमत वाढवत आहे. लोक सहसा सोने खरेदी करून ठेवतात कारण ते अस्थिरतेपासून सुरक्षित मानले गेले आहे. रुपया-डॉलरच्या समीकरणाचा सहसा सोन्याच्या जागतिक किमतीवर परिणाम होत नाही परंतु भारतामध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत असल्यामुळे, देशांतर्गत किमती उसळतात. या काळात तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही हे ठरविण्यासाठी काही महत्त्वाच्या आर्थिक निदर्शकांवर नजर टाकू या.

गेल्या अनेक दशकांपासून देशांतर्गत सोन्याच्या किमती सातत्याने वाढत गेल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सोन्याची किंमत वाढण्यावर परिणाम करणारे अनेक आर्थिक घटक आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, कच्च्या तेलाची किंमत, महागाई दर आणि रेपो दर हे असे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत जे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत ठरविण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. माध्यमांतील अहवालानुसार, २५ ऑक्टोबर रोजी सोन्याची किंमत एका तोळ्यासाठी साधारण ३१,९७० रुपये होती. सध्याच्या बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमूल्यन पाहता सोन्याच्या गुंतवणुकीची परिस्थिती सुधारलेली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सोन्याच्या किमतीच्या व्यस्त प्रमाणात आहे.

भारत कच्च्या तेलाच्या आयातीसाठी इराणवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणसह व्यापारबंदी करण्याच्या अमेरिकेच्या घोषणेमुळे भारत कॅच २२ परिस्थितीमध्ये अडकला आहे. जर भारताने इराणकडून कच्चे तेल आयात करणे थांबवले तर, कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च आणखी वाढले आणि रुपया जास्त कमकुवत होईल. जर थांबवले नाही तर, अमेरिकेच्या बंदीमुळे तसेही रुपयाचे अवमूल्यन होईलच. तेव्हा, नजीकच्या भविष्यात रुपया आणखी घसरून देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या किमती वाढतील.

कोणत्या स्वरूपात सोने खरेदी करावे

दागिन्यांच्या स्वरूपांत सोने खरेदी करून सोनारांना घसघशीत फायदा देणे टाळा. हे दागिने परत विकताना त्याची किंमत कमी केली जाते आणि त्यामुळे या गुंतवणुकीवरील परतावा शेवटी तितकासा आकर्षक राहात नाही. सोन्याची बिस्किटे आणि नाणी विकत घेण्याचाही हाच तोटा आहे. तसेच पुन्हा ते सुरक्षित ठेवण्याची काळजी असतेच.
त्याऐवजी गोल्ड-ईटीएफ आणि सोवेरीन गोल्ड बॉन्ड (SGB) यांसारख्या इलेक्ट्रॉनिक किंवा कागदी स्वरूपातील पर्यायी सोन्याच्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करा. चोरीची जोखीम नाही आणि त्यांची तुम्हाला बाजारात सहज खरेदी विक्री करता येते. सध्या, दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एसजीबी हा एक आकर्षक पर्याय आहे, कारण यामध्ये भांडवल तर वाढतेच, पण त्याचबरोबर गुंतवणूकदारांना व्याज दराचा फायदाही मिळतो. एसजीबी गुंतवणुकीवरील सध्याचा व्याजदर वार्षिक २.५ टक्के आहे. रिडीम केल्यावर, एसजीबी वर मिळणारा भांडवली नफा करातून वगळलेला आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी सोन्याच्या इतर कोणत्याही पर्यायांपेक्षा एसजीबीची निवड करावी, कारण येथे त्यावर कोणताही खर्च आकारला जात नाही.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार