दरवर्षी नवीन कार..तीही स्वत:च्या खिशातून पैसे न घालता! स्वप्नवत वाटावी अशी ही गोष्ट आता भारतातही शक्य आहे. ग्राहकांना कार भाडय़ाने उपलब्ध करून देण्याचे व्यावसायिक प्रारूप भारतातसुद्धा आले आहे. मारुती आणि टाटा मोटर्स या कंपन्या स्वत: ही योजना राबवित आहेत तर टोयोटा किलरेस्कर मोटर्स, हुंदाई मोटर्स त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या माध्यमातून ही योजना राबवीत आहेत. मारुतीने नुकताच या योजनेचा विस्तार केला आहे.

वाहनांची दरवर्षी येणारी नवनवीन मालिका, त्यातून दरवर्षी नवीन गाडी हाती असण्याची उमेद आणि इच्छा बाळगणारा तरुण ग्राहक वर्ग, वाहनांची घटती पुनर्विक्री किंमत, देखभालीची कटकट, स्वत:च्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त किमतीच्या मोटारी यामुळे स्वत:च्या मालकीचे वाहन असण्यापेक्षा ते भाडय़ाने घेण्याचा नवा कल जागतिक आणि भारतीय ग्राहकांमध्ये वाढत आहे. त्यात करोनानंतर ग्राहक सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनांना पसंती देत आहेत. मात्र वाहन घेणे परवडत नसल्याने भाडेतत्त्वावर मोटारीचा पर्याय उपलब्ध होत आहे.

सध्या अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक बँकेतर संस्थांनी वाहन कर्ज देताना हात आखडते घेतले आहेत. शिवाय बदलत्या वाहन कायद्यांची आणि नियमावलींची अनिश्चितता लक्षात घेता वाहनांच्या पुनर्विक्री किमतीबाबत कोणीच खात्री देऊ  शकत नाही. अशा या अनिश्चिततेच्या काळात कोणालाही आपला पैसा वाहनात अडकून ठेवण्यात रस नाही. त्यापेक्षा नव्या कोऱ्या गाडय़ा भाडे तत्त्वावर घेता येतात. मुख्य म्हणजे त्या काही काळानंतर बदलता येतात, हे या नव्या प्रारूपाचे वैशिष्टय़ आहे.

टाटा मोटर्सची नेक्सन ही विजेवरची कार १८, २४ किंवा ३६ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेता येते. मारुतीच्या गाडय़ा जर गाडी तुमच्या नावावर हवी असेल तर २४, ३६, ४८ महिने कालावधीसाठी आणि जर कार भाडय़ाने देणाऱ्याच्या नावे चालणार असेल तर १२, १८, २४, ३०,३६,४२ किंवा ४८ महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. यात दरमहा भाडेनिश्चिती एकदाच केली जाते. वाहन विमा, वाहनांची निगा याबाबत चिंता नाही तसेच देशभरात उपलब्ध असून दिवसरात्र आकस्मिक साहाय्य सेवा हे या नव्या प्रारूपाचे आकर्षण आहे. शिवाय ठरावीक काळानंतर तुम्ही वापरत असलेली कार विकत घेण्याची सुविधाही ग्राहकाला मिळते आणि नको असेल तर वाहन विकत घेण्याची जबरदस्ती पण नाही. ओला, उबेर यासारख्या वाहन सेवा पुरविणाऱ्याची संख्या जरी अधिक असली तर ‘कोविड १९’ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वैयक्तिक स्वच्छता आणि वाहनांची स्वच्छता याबाबत ग्राहक फार चोखंदळ आणि सतर्क आहेत. या पार्श्वभूमीवरसुद्धा हे नवीन प्रारूप बाळसे धरेल असे वाटते.

विशिष्ट प्रदीर्घ कालावधी (२१ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त) साठी कार वापरली जाणार नसेल, तर ती दुसऱ्याला भाडेतत्त्वावर देण्याची सोय पण काही कंपन्यांनी केली आहे. म्हणजे मोटारीचा जेवढा वापर तेवढेच भाडे ग्राहकाला द्यावे लागणार. वाहननिर्मिती कंपन्या पण या व्यवसायात उतरल्या असून मारुतीच्या बलेनो, स्विफ्ट डिझायर, व्हिटारा ब्रेझा आणि सियाझ ही वाहने भाडेतत्त्वावर विकली जातात. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मारुतीने ६ हजार ७०० च्या आसपास गाडय़ा भाडेतत्त्वावर ग्राहकांना सुपूर्द केल्या आहेत. मारुती आणि टाटा मोटर्स  या कंपन्या स्वत: ही योजना राबवित आहेत तर टोयोटा किलरेस्कर मोटर्स, ह्युंदाई मोटर्स त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या माध्यमातून ही योजना राबवीत आहेत. एएलडी, ऑटोमोटिव्ह, ओरीक्स, झूम कार्स या कंपन्या भाडोत्री वाहन क्षेत्रात कार्यरत असून महिंद्रा अँड  महिंद्राने तर झूम कार्समध्ये १७६ कोटींची गुंतवणूक केली आहे.

मोटारगाडय़ा भाडय़ाने देणाऱ्या कंपन्या, फक्त मोठ-मोठय़ा कंपन्यांच्या मागे न जाता, लघु, मध्यम उद्योजकांवर ग्राहक म्हणून लक्ष केंद्रित करीत आहेत. इतकंच नव्हे तर वाहनांचे वाढते आयुष्यमान, दिवसेंदिवस कमी होत जाणारा देखरेखीचा आकस्मिक खर्च लक्षात घेता पुनर्विक्रीत वाहनांच्या बाजारातसुद्धा भाडोत्री गाडय़ांची चलती राहील असा अंदाज या क्षेत्रातले तज्ज्ञ वर्तवत आहेत. स्वत:च्या मालकीचे वाहन असल्याने मिळणारा सामाजिक दर्जा, मानमरातब, त्यातून वाढत जाणारी वाहन खरेदीची भारतीय नागरिकांची आकांक्षा, मानसिकता, तसेच भाडोत्री वाहने महाग पडत असल्याच्या समजावर मात करून हे भाडोत्री वाहनांचे व्यावसायिक प्रारूप भारतात कसे बाळसे धरते याकडे अनेक जण डोळे लावून बसले आहेत.

उदयन पाठक

उपमहाव्यवस्थापक, टाटा मोटर्स पुणे आणि अध्यक्ष एएसएम इंटरनॅशनल पुणे.

कालावधी मासिक भाडे

१२     ४१५००

२४     ३७५००

३६    ३४९००

टाटा नेक्सन ईव्ही (एक्स झेड+) (संदर्भ: टाटा मोटर्सच्या आंतरजालावरील माहिती)

कालावधी       मासिक भाडे

१२                  २५२४६

१८                 २४१६६

२४                  २३३६१

३०                  २२७१२

३६                   २२१५३

४२                    २१६८१

४८                     २१२७२

मारुती डिझायर (व्ही एक्स आय एमटी)  (संदर्भ: मारुतीसुझुकीच्या आंतरजालावरील माहिती)

दरात लवचिकता

* कार १२,१८,२४,३०,३६,४२,४८ महिन्यांसाठी भाडय़ाने घेता येणार

* आपल्याल्या परवडणाऱ्या दरात कार उपलब्ध

सुविधा

* सर्व खर्च भाडय़ामध्ये समाविष्ट

* आवडली तर विकतही घेता येणार

* दिवसरात्र मदत