– डॉ. अरुणा टिळक

विटेवर विटा ठेवत काम करणारा गवंडी, त्याला नेहमी वाकून किंवा पायावर उकिडवे बसून काम करावे लागते. त्यामुळे त्यांना गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होतो.

सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी त्यांची कामाची वेळ असते. त्यांनी घरातून जाताना पोटभर नाश्ता करून जावे. त्यात चपाती-भाजी असावी. त्यांच्या आहारात सोयाबीन वडीचा उपयोग होतो. त्यातून पुरेशी प्रथिने मिळतात. त्यांचे काम कष्टाचे असते. गुडघ्यावर, कमरेवर ताण असतो. त्यासाठी त्यांनी जेवणात चटण्या (लसूण+ खोबरे+ काळी मिरी), (काºहळे+ तीळ+ लसूण) अशा चटण्या घ्याव्यात. त्यावर कच्चे तेल घ्यावे. दुपारी घरून आणलेले जेवण घ्यावे. बाहेरचे समोसे, वडापाव टाळावे.

कामावर असताना बऱ्याच जणांना चहा घेतल्याशिवाय काम सुरूच करता येत नाही. पण खूप वेळा चहा घेणे टाळावे. उन्हामध्ये काम करताना त्यांना लघवीचा त्रास होतो. अशांनी घरातून निघताना घरी आल्यावर धने-जिरे पाणी नक्की वापरावे. त्यांना काम करताना खूप पाणी प्यावे लागते, कारण ती त्यांची गरज असते. दुपारी ताक+जिरे पावडर नक्की घ्यावे. त्यांना जेव्हा मशीनवर काम करावे लागते, टाइल्स- कडप्पा कापताना धूळ उडते ती धूळ नाकातोंडात जाऊन सर्दी-खोकला, नाक गच्च होणे होऊ  शकते. तेव्हा त्यांनी नाकावर रुमाल जरूर बांधावा. कामावर निघताना नाकाला आतून तेल लावावे. रात्री चपातीबरोबर काळा गूळ जेवणात घ्यावा. त्याने कफाचा त्रास होत नाही. तसेच नाकाला बाहेरून सुंठ, वेखंड लावावे. छातीला, पाठीलापण तेल लावावे त्याने छातीत- नाकात कफ साठत नाही. त्यांना विडी, तंबाखू, मद्यपान या व्यसनांचा आधार घ्यावा लागतो, कारण त्यांचे काम कष्टाचे असते. छातीत कफ होऊ  नये म्हणून अळशीचा उपयोग मुखवास किंवा चटणीत करावा. रात्रीच्या जेवणात अन्न गरम घ्यावे. त्यात आठवड्यातून एक-दोनदा (पचनशक्ती नुसार ) उडीद डाळ भाजून, लसूण घालून आमटी वापरावी. त्यांनी पोळीमध्ये सोयाबीन, थोडी उडीद डाळ, थोडी मेथी घालून कणीक करून ती वापरली तर ताकद टिकून राहण्यासाठी उपयोग होतो. संध्याकाळी घरी आल्यावर आंघोळ केली की झोपण्यापूर्वी सगळ्या अंगाला तेल नक्की लावावे. त्यामुळे दिवसभराचा थकवा जातो.