X

कृत्रिम पेशींच्या मदतीने जिवाणूंशी लढा शक्य

व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असल्यास ही प्रक्रिया हवी तितक्या प्रभावीपणे घडत नाही.

संशोधकांनी प्रयोगशाळेत मानवी शरीरातील पेशींसारख्या कृत्रिम पेशी तयार केल्या असून त्यांच्या मदतीने जिवाणूंच्या संसर्गाशी लढणे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या शरीरावर रोग उत्पन्न करणाऱ्या जिवाणू किंवा अन्य सूक्ष्म जीवांचे आक्रमण झाल्यास शरीरातील पेशी त्यांच्याशी लढून रोगावर नियंत्रण ठेवतात.

व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असल्यास ही प्रक्रिया हवी तितक्या प्रभावीपणे घडत नाही. अशा वेळी या कृत्रिम पेशी मानवी पेशींच्या मदतीला धावून येऊ शकतात. त्या जंतूंचा नायनाट करून शरीर पुन्हा निरोगी बनवू शकतात. यामुळे नवी उपचार पद्धती अस्तित्वात येऊ शकते.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक चीमेंग तान यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने या विषयावर संशोधन केले. त्यांनी लेगो ब्लॉकपासून कृत्रिम पेशी तयार केल्या. या पेशी लायपोसोम्सपासून तयार केल्या आहेत. त्यांना नेहमीच्या पेशींप्रमाणेच आवरण असून त्यात डीएनए आणि अन्य घटक आहेत. या पेशी मानवी शरीरातील जिवाणूंचे संक्रमण शोधून त्याच्याशी मुकाबला करू शकतात. जिवाणू शोधून त्यांना नष्ट करू शकतात.

यापूर्वी कृत्रिम पेशी केवळ प्रयोगशाळेतील आदर्श वातावरणात यशस्वीपणे काम करू शकत होत्या. मात्र या संशोधकांनी त्याच्या आवरण, सायटोसोल आणि जनुकीय रचनेत बदल करून त्यांना अन्य वातावरणातही काम करण्यास सक्षम बनवले. अशा पेशी भविष्यात मानवी शरीरातील जंतुसंसर्गाचा मुकाबला करू शकतील. तसेच शरीरात योग्य ठिकाणी औषधे पोहोचवू शकतील किंवा जैविक संवेदक म्हणूनही काम करू शकतील.