21 October 2020

News Flash

जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्त्व

या एकादशीचे नेमके महत्त्व काय आहे ते समजून घ्यायला हवे.

आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरु आहे. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. इतके दिवस ज्या विठ्ठलासाठी चालत आलो ते अखेर भेटल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. शहरातही जे वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.

हे सगळे असले तरीही या एकादशीचे नेमके महत्त्व काय आहे ते समजून घ्यायला हवे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 8:25 am

Web Title: ashadhi ekadashi 2019 importance of ashadhi ekadashi vitthal rukmini pandharpur wari rituals and traditions nck 90
Next Stories
1 उपवासाच्या दिवशी पोटाला त्रास न होणारे पदार्थ
2 कार नाही चमत्कार! शेकडो किमी अंतर रिमोटने कापणार
3 ३२ अब्ज डॉलरला विकत घेतली कंपनी; IT क्षेत्रातील आजवरचा सर्वात मोठा करार
Just Now!
X