अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा
अस्थमा, घोरणे किंवा तिरळेपणा यांचा परिणाम व्यक्तीच्या दृष्टीवर होऊ शकतो, असा दावा अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. अतिशय कमी वयात या विकारांमुळे जवळचे न दिसण्याचा दृष्टिदोष उद्भवू शकतो, असे मत या तज्ज्ञांनी संशोधनाअंती व्यक्त केले.
संशोधनातून केला गेलेला दावा हा आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा आरोग्यविषयक संशोधनातून केला गेला आहे, ज्याला ‘केराटोकोन्स’ असेही संबोधण्यात येते. केराटोकोन्समुळे डोळ्याच्या बाहुलीमधील पारदर्शक पडदा हा कमकुवत होऊन त्याचा आकार कालांतराने शंकूच्या आकारात परावर्तित होतो.
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील या संशोधकांनी अस्थमा, घोरणे आणि तिरळेपणा असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याचा अभ्यास केला. हे विकार असलेल्या व्यक्तींमध्ये ‘केराटोकोन्स’चा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते, असे या संशोधकांनी सांगितले. आफ्रिकन आणि अमेरिकन वंशाच्या व्यक्तींमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसतो. मात्र आशियाई वंशांच्या व्यक्तींमध्ये आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये या आजाराची शक्यता कमी असल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले आहे.
बळकट दृष्टीचा संबंध हा आरोग्याशी जोडलेला आहे. त्यामुळे नेत्रचिकित्सक या नात्याने रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करताना अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे मत यूएम मेडिकल स्कूलचे साहाय्यक प्राध्यापक आणि प्रथम अभ्यासक मारिया वुडवार्ड यांनी व्यक्त केले आहे.
या वेळी संशोधकांनी आरोग्यविषयक विमा दाव्यांच्या विविध प्रकरणांचा अभ्यास केला. त्यातील १६ हजार दाव्यांपैकी अध्र्याहून अधिक दावे असणाऱ्या लोकांमध्ये कोराटोकोन्स असल्याचे आढळून आले. निम्म्या लोकांना कोराटोकोन्स आजार नसला तरी त्याची लक्षणे मात्र आढळून आली आहेत. यामुळे कोराटोकोन्स आजाराशी संबंधित परिस्थिती कशी आहे किंवा नाही याविषयीचा निष्कर्ष काढण्यात आला. या अभ्यासात ३० ते ४० वयोगटातील लोकांचाच समावेश केला गेला आहे. त्यातून या आजाराविषयीच्या यापूर्वी झालेल्या अभ्यासामधील दाव्यांची सत्यतादेखील पडताळण्यात आली.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)