गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या Asus 6Z या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू होत आहे. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर दुपारी १२ वाजेपासून सेलचं आय़ोजन करण्यात आलं आहे. केवळ फ्लिपकार्टवरुनच या फोनची विक्री होणार आहे. हा स्मार्टफोन खरेदी केल्यास फ्लिपकार्टकडून 3 हजार 999 रुपयांचा मोबाइल प्रोटेक्शन प्लान हा अवघ्या 99 रुपयांना उपलब्ध आहे. त्याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ईएमआयवर 5 टक्के अधिक सवलत उपलब्ध असेल. तसंच अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के सवलत मिळणार आहे.

खरं म्हणजे हा Asus ZenFone 6 आहे, मात्र दिल्ली हायकोर्टाच्या आदेशामुळे कंपनी झेन किंवा झेनफोन ही ट्रेडमार्क नावं वापरु शकत नाही. त्यामुळे या फोनचं नाव बदलून Asus 6Z असं ठेवण्यात आलं आहे. या स्मार्टफोनचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा. या फोनमध्ये असलेला 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा पॉप अपसह बाहेर येतो आणि रोटेट होऊन फ्रंट कॅमेऱ्याचंही काम करतो. लिक्विड मेटलचा वापर करून हा फ्लिप कॅमेरा बनवण्यात आला आहे. फोटो काढत असताना मोबाइल कॅमेरा हातातून पडल्यास पॉप अप स्वत:हून बंद होईल असा दावाही कंपनीने केला आहे. Asus ZenFone 6 हा स्मार्टफोन सर्वप्रथम मे महिन्यात स्पेनमध्ये लाँच करण्यात आला होता.

नॉचशिवाय फुल-एचडी+ डिस्प्ले असलेल्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, 8 जीबीपर्यंत रॅम आणि 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 31 हजार 999 रुपये, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 34 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम/ 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर 26 जूनपासून या फोनची विक्री सुरू होईल. मिडनाइट ब्लॅक आणि ट्विलाइट सिल्वर या दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. या फोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी क्षमता असून 18w क्विकचार्ज 4.0 सपोर्ट आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर्ससह ड्युअल स्मार्ट अॅम्प्लीफायर आणि 3.5 मिलीमीटर ऑडियो जॅक आहे. यातील इनबिल्ट स्टोरेज मायक्रो एसडीकार्डद्वारे 2 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये युएसबी टाइप-सी, एनएफसी, वाय-फाय 802.11एसी (वाय-फाय 5), ब्ल्यु-टूथ व्हर्जन 5.0 आणि जीपीएस आहे.