जगातील कठीण ट्रायलॉथॉन स्पर्धांपैकी एक असणाऱ्या झुरीच येथील ट्रायलॉथॉन स्पर्धेत मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या मिलिंद सोमणने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे वयाच्या ५०व्या वर्षी मिलिंद सोमणने शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी ही स्पर्धा पूर्ण करून दाखविली. बॉलीवूडमध्ये उत्तम फिटनेस राखून असलेला सेलिब्रिटी म्हणून मिलिंद सोमणची ओळख आहे. ट्रायथलॉन म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा. यात मुख्यतः धावणे, पोहणे आणि सायकल चालवणे या क्रीडाप्रकारांचा समावेश असतो. हे तिन्ही क्रीडाप्रकार सलग पार पाडायचे असून त्याचं अंतर ठरलेले असते.
स्वित्झर्लंडमधील झुरीच येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत जगभरातील तब्बल २००० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर अंतरासाठी सायकल आणि ४२.२ किलोमीटर अंतर धावून पार करणे असे या स्पर्धेचे स्वरूप असते. स्पर्धकांना हे सर्व अंतर १६ तासांत पार करायचे होते. त्यामुळे वर्ल्ड ट्रायलॉथॉन कॉर्पोरेशतर्फे आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा जगातील कठीण स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मिलिंद सोमणने पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने १५ तास आणि १९ मिनिटांमध्ये हे अंतर पूर्ण केले.
मिलिंद ४ नोव्हेंबर २०१५ रोजी वयाची पन्नाशी गाठणार आहे. या स्पर्धेचे विजेतेपद हेच माझ्यासाठी यंदाच्या वाढदिवसाची भेट आहे, असे मिलिंद सोमणने म्हटले आहे. मी केलेल्या मेहनतीचे फळ मला मिळाले, हा एक अत्यंत आगळा-वेगळा आणि सुंदर अनुभव होता, असेही मिलिंद सोमणने सांगितले.
दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेल्या ७ पैकी ५ भारतीय स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. आयर्नमॅनचा किताब ११ वेळा जिंकणाऱ्या पुण्याच्या कौस्तुभ राडकर यांनी १२ तास ३२ मिनिटांत ही स्पर्धा पार करत १२ व्यांदा जेतेपदाला गवसणी घातली.