ऑटोमोबाईल क्षेत्रात मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात स्पर्धा सुरु झाली आहे. उत्तम लूक, चांगले अॅव्हरेज आणि इतर अनेक सुविधा देणाऱ्या दुचाकी घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार निर्मिती करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचे चित्र आहे. देशातील सर्वच शहरांत दुचाकी वापऱण्याच्या प्रमाणात वाढ होत असताना कंपन्याही ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध करुन देत आहेत. दुचाकी बनवण्यात आघाडीवर असलेल्या एथर एनर्जी कंपनीने नुकत्याच आपल्या दोन नव्या स्कूटर लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. इंधनाच्या किंमती सातत्याने वाढत असताना या कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करण्याची घोषणा करुन आपल्या ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे.

या स्कूटर भारतातल्या सगळ्यात महागड्या आहेत. कंपनीनं एथर ४५० आणि एथर ३४० या दोन स्कूटर लॉन्च केल्या. एथर ४५० ची किंमत १,२४,७५० रुपये आणि एथर ३४०ची किंमत १,०९,७५० रुपये आहे. स्कूटरच्या किंमतीमध्ये २२ हजार रुपयांची सबसिडी, जीएसटी, रोड टॅक्स, स्मार्ट कार्ड फी, रजिस्ट्रेशन फी आणि इन्श्युरन्सचा समावेश आहे. कंपनीनं एथर ४५० शहरी भागात चालवण्यासाठी बनवली आहे. ही स्कूटर ८० किमी प्रती तासाच्या वेगाने चालते असे कंपनीचे म्हणणे आहे. सध्या ही स्कूटर केवळ बंगळुरुमध्ये मिळत असून काही दिवसांत ती पुणे, चेन्नईबरोबरच देशातील इतर काही शहरांमध्येही खरेदी करता येईल. सध्या बंगळुरुमधील ग्राहकांनाही प्री-बुकींग करावे लागणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ६० किमीपर्यंत चालू शकते. स्कूटर ८० टक्के चार्ज होण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो. खड्डे असलेल्या रस्त्यावर ही स्कूटर चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा कंपनीनं केला आहे. दोन्ही स्कूटरला फ्रंट आणि रियरमध्ये सीबीएस सिस्टिमसोबत डिस्क ब्रेक देण्यात आलेत. आयआयटी मद्रासमध्ये ४ वर्षांपूर्वी ही स्कूटर बनवायला सुरुवात झाली होती अखेर तिचे सर्व काम आणि प्रयोग पूर्ण झाल्यानंतर ती प्रत्यक्षात खरेदीसाठी बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.