स्वमग्नता या विकारातील आठ वर्षांच्या खालील एक चतुर्थाश मुले निदानाअभावी राहतात. त्यांच्यात एकमेकांशी संपर्क साधण्याची व संवादाची क्षमता नसते असे अमेरिकेतील एका अभ्यासात दिसून आले आहे. ऑटिझम रिसर्च या नियतकालिकात म्हटले आहे की, स्वमग्नता या आजाराबाबत जागरूकता वाढली असली तरी अनेक मुले अजूनही निदानाअभावी तशीच राहतात. कृष्णवर्णीय व हिस्पॅनिक लोकांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे.

अमेरिकेतील रूटगर्स विद्यापीठाने याबाबत संशोधन केले असून त्यांनी २०१४ मध्ये आठ वर्षे वयापर्यंतच्या २ लाख ६६ हजार मुलांच्या वैद्यकीय नोंदी तपासल्या होत्या. त्यात ४५०० मुलांना स्वमग्नता असल्याचे दिसून आले. पण त्यांच्यात २५ टक्के मुलांमध्ये त्याचे निदान झालेले नव्हते. मानसिक क्षमता गमावून बसलेल्या या मुलांना सामाजिक कौशल्ये व दैनंदिन जीवन जगण्याची कौशल्ये साध्य झालेली नव्हती.

रूटगर्स विद्यापीठातील प्राध्यापक वॉल्टर झाहोर्डनी यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्याक समाजातील या मुलांमध्ये हा विकार येण्याची काही कारणे असू शकतात. त्यांच्यात असमानता व सामाजिक भयाची शक्यता जास्त असल्याने असे घडून आले असावे. यातील अनेक मुलांचे स्वमग्नतेचे निदान हे उशिरानेही झालेले होते. विकासात्मक प्रश्नांकडे बघण्यापेक्षा वर्तनात्मक व वैद्यकीय प्रश्नावर लक्ष देण्याची प्रवृत्ती त्याला कारण असावी. लहान मुले, शाळकरी मुले यांच्यात त्याचे प्रमाण जास्त होते. स्वमग्नता असलेल्या मुलांना चित्रे किंवा इतर माध्यमातून संवाद कौशल्य शिकवले जाऊ शकते तसेच त्यांच्या कुटुंबीयांना निदान प्रक्रिया समजून देऊन उपचार सोपे करता येतात.