संशोधकांनी लहान मुलांमधील स्वमग्नतेचे निदान करण्यासाठी नवी रक्तचाचणी विकसित केली आहे. या रक्तचाचणीमुळे पालकांना त्यांच्या मुलांवर लवकर उपचार सुरू करण्यास मदत होणार आहे. ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’ (एएसडी) या विकारांमुळे मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो. स्वमग्न मुलांना स्वत:च्या भावना व्यक्त करण्यास अडचणी येतात. यामुळे वर्तणुकीबाबतच्या अनेक समस्या उद्भवतात. यामध्ये मुलांना बोलण्यात अडचणी येणे, पुनरावृत्तीमय वागणूक, अतिनीलता, चिंता, नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यास अडचण, त्याचप्रमाणे संज्ञानात्मक दुर्बलतेचा सामना करावा लागतो.

एएसडीची लक्षणे विस्तृत असल्याने या विकाराचे प्राथमिक टप्प्यात निदान करणे कठीण आणि अनिश्चित होते. आमच्या या नव्या शोधामुळे स्वमग्नतेचे लवकर निदान करून उपचार सुरू केले जाऊ शकतात, असे ब्रिटनच्या वॉरविक विद्यापीठाच्या नेला रब्बानी यांनी सांगितले.

या नव्या चाचणीमुळे समग्रतेचे नवे कारक घटक स्पष्ट होण्याची आमची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे यामुळे एएसडीचे निदान करण्यात सुधारणा होणार आहे, असे रब्बानी यांनी सांगितले. हा अभ्यास ‘मॉलिक्युलर ऑटिझम’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. ऑक्सिडेशन आणि ग्लाइकेशनमुळे रक्तातील जीवनसत्त्वांमध्ये होणारे दुष्परिणाम आणि एएसडी यामधील दुवा या अभ्यासातून शोधून काढण्यात आला आहे.

अभ्यासादरम्यान एएसडी असणाऱ्या मुलांमध्ये ऑक्सिडेशन मार्कर डिट्रोसीनचे परिणाम जास्त आढळून आले. ३०-३५ टक्के प्रकरणांमध्ये स्वमग्नतेसाठी आनुवंशिक कारणे जबाबदार होती, तर उर्वरित ६४-७० टक्के प्रकरणांमध्ये पर्यावरणाचे घटक, जनुकांमधील परिवर्तन किंवा दुर्मीळ आनुवंशिक प्रकार आदी घटक जबाबदार आढळले. या अभ्यासासाठी इटलीतील बोलोनिया विद्यापीठातील स्वमग्नताग्रस्त ३८ मुलांचा अभ्यास संशोधकांनी केला.