अमेरिकेत स्वयंचलित इन्सुलिन नियंत्रण यंत्र तयार करण्यात आले असून, त्याला कृत्रिम स्वादुपिंड असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या मदतीने रक्तातील शर्करेचे निरीक्षण करून वेळीच इन्सुलिन शरीरात सोडता येते. या यंत्राला अमेरिकेने मान्यता दिली आहे. मानवी स्वादुपिंड नैसर्गिकरीत्या इन्सुलिन पुरवण्याचे काम करीत असते. हा पुरवठा संथगतीने होत असतो. मधुमेह असलेल्या रुग्णात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी झालेली असते. मिनीमेड ६७० जी हायब्रीड ही बंदिस्त प्रणाली असून, त्यातून रक्तशर्करेवर लक्ष ठेवले जाते व इन्सुलिनचा डोस दिला जातो. १४ वर्षे व त्यापुढील वयोगटातील टाइप-१ मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे यंत्र अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंजूर केले असून, टाइप-१ मधुमेहाच्या रुग्णांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. मानवी पातळीवर रक्तशर्करा तपासणे व नंतर इन्सुलिन देणे अवघड असते. त्यामुळे या यंत्राचा उपयोग होईल, असे एफडीएच्या सेंटर फॉर डिव्हाइसेस अ‍ॅण्ड रेडिऑलॉजिकल हेल्थ या संस्थेचे संचालक जेफ्री शुरन यांनी म्हटले आहे. मिनीमेड ६७० जी हायब्रीड हे कृत्रिम स्वादुपिंड असून, त्यात इन्सुलिनची योग्य पातळी राखली जाते. बाहेरून इन्सुलिन द्यावे लागत नाही. ग्लुकोजची पातळी मोजून आपोआप इन्सुलिन दिले जाते. शरीराला संवेदक लावला जातो व त्यातून ग्लुकोज पातळी मोजली जाते. इन्सुलिनचा पंप शरीराला लावलेला असतो. इन्सुलिन कमी होताच त्यातून कॅथेटरच्या मार्गाने इन्सुलिन सोडले जाते. टाइप-१ मधुमेहावर हे उपकरण उपयोगी असून, त्यात आहार व व्यायामाची जोड देणे आवश्यक असते. हे यंत्र १४ वर्षे वयापासूनच्या पुढील लोकांना उपयुक्त आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)