बापू बैलकर

गेले दीड वर्ष मंदीत अडकलेल्या वाहन उद्योगासाठी करोना काळानंतर चांगले दिवस आले आहेत. सप्टेंबर महिन्यात प्रवासी वाहन विक्रीत वाढ नोद झाल्यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसांत दोन लाख प्रवासी वाहनांची नोंद झाल्याचा आकडा समोर आला आहे. ‘मर्सिडीज’ने तर विक्रम केला असून ५५० मोटारी या काळात विकल्या आहेत, तर किआ मोटरने  सॉनेट कारची  दोन महिन्यात  ५० हजारांहून अधिक विक्री केली आहे.

दसऱ्याला मागणी वाढल्याने वाहन उत्पादकांनी आता दिवाळी धमाका करायचा ठरविला असून वाहन खरेदीदारांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

मारुती सुझुकी, होंडा, महिंद्रा आणि महिंद्रा, रॅनो कार यांच्यासह किआ मोटर्सनेही आपल्या कारवर मोठी सवलत जाहीर केली आहे. यासोबतच एक्सचेंज बोनस आणि कापरेरेट सूट यासारख्या अतिरिक्त सवलतीही जाहीर केल्या आहेत.

मारूतीकडूनही सूट

मारुती सुझुकी सेलेरिया खरेदी करायची असेल तर कंपनी या कारवर एकूण ५३ हजार रुपयांची सवलत देत आहे. एस प्रेसो खरेदीवर ४८ हजार रुपये, विटारा ब्रेझावर ४५ हजार रुपये, डिझायरवर ४४ हजार रुपये, ऑल्टोवर ४१ हजार, वेगन आरवर ४० हजार रुपये, स्विफ्टवर ४० हजार रुपये, ईकोवर ३८ हजार रुपये, मारुती अर्टिगावर ५ हजार रुपयांची सूट मिळत आहे. मारुती एस क्रॉसच्या खरेदीवर ७२ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. इग्निसवर ५० हजार रुपयांपर्यंत तर बलेनोवर ३५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मारुती सियवर ४० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

होंडाकडून २.५ लाखांपर्यंत

होंडाने आपल्या कारवर २.५ लाख रुपयांपर्यंत सवलत जाहर केली आहे. नुकतीच बाजारत आलेल्या न्यू २०२० सीटी आणि फेसलिफ्ट या कारही सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. होंडा अमेजवर ३५ हजार रुपयांची सवलत आहे. होंडा जॅज आणि होंडा डब्ल्यूआरव्ही खरेदीवर ३५ हजार रुपयांची सूट मिळत आहे. ही सूट २५ हजार रुपयांच्या कॅश डिस्काऊंट आणि १० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस रूपाने मिळणार आहे. नवीन होंडा सिटी खरेदीवर लॉयल्टी आणि कॉर्पोरेट बेनिफिट्ससोबत एक्सचेंज बोनससुद्धा मिळणार आहे. होंडा सिविकच्या पेट्रोल व्हेरियंटच्या खरेदीवर १ लाख तर डिझेल व्हेरियंटवर २.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या महिन्यात होंडा सिविक कार खरेदी करायची असेल २.६६ लाख रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते.

रेनॉकडून सरकारी कर्मचाऱ्यांना सूट

रेनॉ कारनेही  जबरदस्त सवलत जाहीर केल्या आहेत. रेनॉच्या एन्ट्री सेगमेंट बजेट कार क्विड किंवा ट्रायबर किंवा डस्टर यासारख्या एसयूव्ही कार खरेदी करायची असल्यास यावर ७० हजार रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. दिवळीत रेनॉल्टच्या डस्टरवर ७० हजार रुपये, रेनॉल्ट क्विडवर ४० हजार आणि रेनॉच्या ट्रायबरवर ३० हजार रुपयांपर्यंत सवलत देणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्र वा राज्य सरकारी कर्मचारी तसेच डॉक्टर व शिक्षक यांना अतिरिक्त सूटही मिळणार आहे. या अंतर्गत त्यांना २२ हजार रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते.

२.२ लाख रुपयांची सरसकट सवलत

महिंद्राच्या काही कारवर कंपनीने २.२० लाख रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट जाहीर केला आहे. तसेच ८० हजारांहून जास्त अधिकची सवलतही दिली जाणार आहे. यात एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट सूट यासारख्या ऑफर्सचा समावेश आहे.

फोक्सवेगन वेंटोवर २.२ लाख रुपये

फोक्सवेगनची ही कार २.२ लाख रुपयांच्या बंपर डिस्काऊंट सोबत खरेदी केली जाऊ शकते. ही कार दमदार टीएसआय टबरे पेट्रोल इंजिनसोबत येते. तसेच या कारवर ६० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदेही मिळू शकतात.

किआ कार्निवालवर २ लाख रुपये

किआची कार्निवाल खरेदी केल्यास या महिन्यात २ लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंटसोबत खरेदी करता येऊ शकते. कारवर थ्री इयर मेंटनेंस पॅक आणि एक्सचेंज  यासारख्या ऑफर्स दिल्याआहेत.

जीप कंपासवर २ लाखांपर्यंत बचत

जीपच्या या दमदार एसयूव्हीवर २ लाख रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. ही कार तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनसोबत येते. डिस्काऊंट ऑफर ट्रेलहॉकवर मिळत आहे.

सणासुदीत मागणी वाढणार

सियामचे अध्यक्ष केनिची आयुकावा यांनी सप्टेंबर महिन्यातील वाहन विक्रीतील वाढ जाहीर करताना  सांगितले की, सणासुदीच्या हंगामात आम्हाला चांगली मागणी अपेक्षित आहे. वाहन कर्जाचे व्याज दर ८ टक्केपेक्षा कमी झाले असून हे एका दशकात सर्वात कमी दर आहेत. यामुळे ग्राहकांना नवीन वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहित केले आहे. भारतीय वाहन उद्यागाने कात टाकून, वाहन उत्सर्जन मानकांतही  युरोपीय वाहन उत्सर्जन मानकांबरोबरीने आले आहेत. भारतीय वाहन उद्योग अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि समाजात सातत्याने योगदान देत राहील.

तर ‘मर्सिडीज बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेनक यांनी सांगितले की, यावर्षी सणासुदीत जोरदार विक्री होत उत्साहाला सुरुवात झाली आहे. ग्राहकांच्या या सकारात्मकतेचा आम्हाला आनंद आहे. गाडय़ा वितरित होण्याची आकडेवारी पाहता आम्हाला यंदाच्या हंगामाबद्दल आत्मविश्वास वाटू लागला आहे. बाजारपेठेत रोमांचकता टिकून राहणार आहे. उर्वरित वर्षांत विक्रीची कसर भरून काढण्याचे आमचे प्रयत्न राहतील.