22 July 2019

News Flash

स्वप्रतिकारक रोगामुळे प्रसूतीवर परिणाम

प्रजोत्पादनाच्या वयातील महिलांना स्वप्रतिकारक रोग (अ‍ॅटोइम्युम डिसीज) होण्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रजोत्पादनाच्या वयातील महिलांना स्वप्रतिकारक रोग (अ‍ॅटोइम्युम डिसीज) होण्याचे प्रमाण वाढले आहे. लुपस, एपीएस यांसारख्या या व्याधींमुळे अशा महिलांच्या फलनक्षमतेवर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे काही महिलांना तर गर्भपात घडणे, गर्भावस्थेतच अर्भकाचा मृत्यू आणि मुदतीपूर्व प्रसूती अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.

जेव्हा आपले शरीर आपल्याच शरीराच्या एखाद्या भागाला शरीराबाहेरील वस्तू (फॉरेन बॉडी) समजून त्याविरोधात प्रतिकार यंत्रणा कार्यान्वित करते, तेव्या या प्रक्रियेला स्वप्रतिकारकतेची व्याधी असे म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महिलांमध्ये अशा रोगांचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. यात प्रजोत्पादनातील वयातील महिलांचाही समावेश आहे.

यापूर्वी बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या महिला रुग्णांमध्ये स्वप्रतिकारक रोगांचे निदान होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. परंतु, आता रोगनिदानाच्या चाचण्यांमध्ये सुधारणा झाल्याने महिलांमधील अशा रोगांचे निदान होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत गेले आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

याबाबत दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) ऱ्ह्यूमॅटोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. उमा कुमार यांनी एका २७ वर्षीय महिलेचे उदाहरण दिले. या महिलेचे दीड वर्षांच्या काळात दोन गर्भपात करावे लागले. बाळंतपण यशस्वी होण्याचे कारण शोधण्यासाठी अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर तिने ‘एम्स’मध्ये धाव घेतली. तेथे तिच्या काही चाचण्या केल्यावर तिला ‘अ‍ॅन्टिफॉस्फोलिपिड अ‍ॅन्टिबॉडी सिन्ड्रोम’ (एपीएस किंवा एपीएलएस) झाल्याचे निदान झाले. हा एक स्वप्रतिकारक रोगाचा तीव्र प्रकार आहे. उपचारांनंतर २०१३ मध्ये तिची यशस्वी प्रसुती झाली. अशा प्रकारच्या रोगांत पहिल्या प्रकारचा (टाईप १) मधुमेह, ऱ्ह्युमॅटाईड अथ्र्रायटिस, लुपस आदींचा समावेश होतो. योग्य निदान झाल्यास, योग्य औषधोपचार घेतल्यास अशा रुग्णांची समस्या जरी पूर्णत: नाही तरी बरीचशी दूर होते. ते चांगले आयुष्य जगतात, असे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉ. नीरज जैन यांनी सांगितले.

First Published on March 10, 2019 12:49 am

Web Title: autotrophic disease pregnancy