वर्ष 2018 मध्ये अनेक इलेक्ट्रिक गाड्या भारतीय वाहन क्षेत्रात दाखल झाल्या. आता अजून एक इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल झाली आहे. Avan Motors कंपनीने भारतात नवी इलेक्ट्रिक स्कूटर Xero Plus ही लाँच केली आहे. 47 हजार रुपये इतकी या स्कूटरची किंमत आहे. सप्टेंबर 2018 मध्ये ही स्कूटर सर्वप्रथम सादर करण्यात आली होती.

देशात इलेक्ट्रिक गाड्यांकडे ग्राहकांचा कल वाढावा या हेतूने Xero Plus ची किंमत कमी ठेवण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. या स्कूटरमध्ये ड्युअल लिथियम-आयन बॅटरी पॅकसह 800 Watts ची इलेक्ट्रिक मोटार आहे. ही लिथियम-आयन बॅटरी दोन ते चार तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. सिंगल बॅटरीद्वारे 60 किमीपर्यंतचा प्रवास करता येईल, तर दोन्ही बॅटरी चार्ज केल्यास 110 किमीपर्यंतचा प्रवास करता येणं शक्य होणार आहे. बॅटरी स्कूटरमधून काढणं सहज शक्य आहे, त्यामुळे घरात असलेल्या इलेक्ट्रिक सॉकेटद्वारेही चार्जिंग करता येणार आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलं आहे.

प्रतितास 45 किमी इतका स्कूटरचा टॉप स्पीड असून गाडीच्या मागील बाजूमध्ये15.2-लिटरचा स्टोरेज बॉक्स आहे. पुढील बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक असून कमाल 150 किलोग्रामपर्यंतच्या वजनासह या स्कूटरवरुन प्रवास करता येईल. तसंच कंपनीकडून अॅक्सिडंट वॉरंटीचा पर्यायही दिला जात आहे. इतर कोणत्याही पेट्रोल बाइकच्या तुलनेत या स्कूटरसाठी केवळ 10 टक्के खर्च येईल असा दावा कंपनीने केला आहे. लवकरच या स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह काही टेक फीचर्स देखील दिले जाणार आहेत.