सध्या कर-बचत करण्याचा हंगाम सुरू आहे. अशा वेळेस करदाते त्यांची बचत अशा गुंतवणुकींमध्ये ठेवायच्या प्रयत्नात असतात ज्यामुळे त्यांना कमी कर द्यावा लागेल. खरं तर कर-नियोजन म्हणजेच टॅक्स प्लॅनिंग वित्तीय वर्षाच्या सुरूवातीपासूनच केले पाहिजे. तरीही, जर तुम्ही ऐन वेळेचे महारथी असलात, तर मात्र गुंतवणुकीचे पर्याय पडताळून पाहाताना खालील चुकांपासून सावध राहा.

तुमच्या उद्दिष्टांना साजेशा गुंतवणुकी न निवडणे

घाईत निर्णय घेण्याचा एक दुष्परिणाम अविचारी गुंतवणूक असू शकतो. तुम्ही कर-बचत करून देणारी गुंतवणूक तर करता, पण ती जर तुमच्या वित्तीय उद्दिष्टांना पूरक नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. जर कोणाला निकट भविष्यात पैसा काढून घ्यायला लागणार असेल तर त्यांनी पीपीएफ मध्ये गुंतवणूक करून चालणार नाही, कारण त्यातून पैसा लवकर काढता येत नाही. तुम्ही गुंतवणूक ठरविण्याआधी तुमच्या आर्थिक गरजा पाहून नंतरच असा मार्ग निवडणे योग्य आहे जो तुम्हाला तुमचे उद्दिष्ट मिळवून देण्यात मदत करेल.

अपुरे कव्हर असलेली विमा पॉलिसी घेणे

विमा पॉलिसी एक अत्यावश्यक गोष्ट असून त्याचा उद्देश पॉलिसी धारकाच्या कुटुंबीयांना त्याच्या अकाली मृत्यूपासून येणाऱ्या आर्थिक आपत्तीवर मात करण्यात मदत करणे हा आहे. फक्त कर-बचत करण्यासाठी कुठलीही पॉलिसी घेतल्याने तुम्हाला अशी पॉलिसी मिळू शकते जिची तुम्हाला गरज नाही किंवा ज्यात अधिक कव्हर नसते. तुम्हाला पाहिजे असलेले विमा धन जाणून घेणे गरजेचे असते. साधारणपणे तुम्हाला सध्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० पट अधिक कव्हरची गरज असते. एवढा पैसा तुमचा अकाली मृत्यू झाल्यास तुमच्या कुटुंबियांना पुरेसे उत्पन्न मिळवणे, उर्वरित कर्ज पूर्ण करणे आणि मुलांच्या शिक्षणासाठी पुरेसा असतो.

संपत्ती निर्माण न करणे

फक्त कर-बचत किंवा विमा एवढेच उद्दिष्ट ठेवणे मोठी चूक ठरेल. तुम्हाला संपत्ती सुद्धा निर्माण करायला हवी. कर-बचतीची सर्व साधने किंवा सर्व विमा पॉलिसी संपत्ती निर्माण करण्यासाठी आदर्श मार्ग नसतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही ३० टक्के कर देत असाल, तर पाच वर्षांची ७ टक्के परतावा देणारी मुदत ठेव तुम्हाला फक्त कर-पश्चात ४.९ टक्के परतावा देते. चलनवाढीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि लवकर संपत्ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला ईएलएसएस किंवा यूएलआयपी यासारख्या साधनांचा वापर करावा लागेल. या पर्यायामुळे कर-बचतही होते.

भविष्याचा विचार न करणे

काही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकींमध्ये तुम्हाला नियमित पैसे टाकावे लागतात. अशा गुंतणुकीची निवड केलीत, तर तुम्हाला दर वर्षी त्यात पैसे भरावे लागू शकतात. आयुर्विमा आणि पीपीएफ अशाच गुंतवणुकी आहेत. जर तुम्ही यांत नियमित पैसे नाही भरले, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच, दीर्घ मुदतीची गुंतवणूक करण्याआधी त्याची मुदत समजून घ्या आणि स्वतःची क्षमता सुद्धा.

आरोग्यविम्याचे पैसे रोख भरणे

अचूक गुंतवणूक निवडतानाच तुम्हाला कर-लाभ घेण्यासाठी योग्य प्रकाराने पैसे भरण्याची माहिती असणे सुद्धा आवश्यक आहे. उदाहरणार्थ, आरोग्यविमा पॉलिसीचे पैसे जर रोख भरलेत, तर त्यावर कर-लाभ मिळत नाही. तसेच, जर १० हजार पेक्षा अधिकचे दान जर रोख दिले असेल, तर त्यावर सुद्धा कर-लाभ मिळत नाही. या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

लहान कर-लाभांकडे लक्ष न देणे

कर-बचत करण्याचे इतर मार्ग, जसे मुलांच्या शाळेची फी, एलटीए, शैक्षणिक कर्जावरील व्याज इत्यादी विसरू नका. गुंतवणूक आणि खर्चाच्या पावत्या सांभाळून ठेवा कारण कर-लाभ घेताना त्यांची गरज पडते.

 

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार