वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकारांमुळे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी ट्विटर हँडल CyberDost वरुन युजर्सना इशारा देण्यात आला आहे. फेक कॉल्सबाबत युजर्सना सतर्क करण्यात आलं आहे.

युजर्स फेक कॉल्सना बळी पडू नयेत यासाठी CyberDost ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. फसवणुकीसाठी केले जाणारे बहुतांश कॉल्स +92 पासून सुरू होणाऱ्या क्रमांकांवरुन केले जात आहेत. अशा क्रमांकांवरुन युजर्सना सामान्य कॉल्सशिवाय व्हॉट्सअ‍ॅप कॉल देखील केले जात आहेत. कॉल करणारे बोलण्यामध्ये गुंतवून डिटेल्स चोरी करतात. अशा कॉल्सचा हेतू युजर्सची खासगी आणि संवेदनशील माहिती चोरण्याचा असतो.  फसवणूक करणारे एकापेक्षा अधिक क्रमांकावरून म्हणजे +01 ने सुरु होणाऱ्या नंबर्सवरूनही युजर्सना कॉल करत असल्याचं समोर आलं आहे.


आमिष दाखवून डिटेल्स चोरी :-
कॉल दरम्यान लोकांचे बँक अकाउंट नंबरपासून डेबिट कार्ड डिटेल्सपर्यंतची माहिती चोरी केली जाते. यासाठी फोनवर लॉटरी जिंकण्याचं किंवा लकी ड्रॉमध्ये नाव आल्याचं आमिष दिलं जातं आणि जिंकलेली रक्कम अकाउंटमध्ये पाठवण्याच्या नावाखाली बँकिंग डिटेल्स मागितले जातात. फ्रॉड करणारे युजरला जाळ्यात अडकवण्यासाठी एखाद्या मोठ्या कंपनीचं नाव वापरतात. याशिवाय अनेकदा कॉलरकडून QR कोड किंवा बार कोड पाठवून स्कॅन करण्यास सांगितलं जातं. चुकूनही असे कोड स्कॅन करु नका. फसवणूक करणारे एकापेक्षा अधिक क्रमांकावरून म्हणजे +01 ने सुरु होणाऱ्या नंबर्सवरूनही युजर्सना कॉल करु शकतात. त्यामुळे असे कॉल आल्यास कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, सावध रहा आणि तुमच्या बँकेची माहिती देणं टाळा.