हल्ली अगदी प्रत्येकजण आपली त्वचा, केस आणि एकंदर सर्वांगीण आरोग्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा अधिकाधिक वापर करताना दिसत आहे. रासायनिक आणि अनेक प्रक्रिया झालेल्या उत्पादनांवर खर्च करण्यापेक्षा, नैसर्गिक आणि आपल्याला अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या रोजच्या वापरातील घटकांचा वापर लोकांना अधिक योग्य वाटू लागला आहे. ह्यापैकीच एक अत्यंत गुणकारी, औषधी आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे हळद. रोजच्या जेवणातून तर हळद आपल्या शरीरात जातेच. परंतु, स्किनकेअरच्या विश्वात असलेलं तिचं महत्त्व देखील असामान्य आणि अगदी खास आहे.

जोव्हिसच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक राखी आहूजा म्हणतात कि, “हा सोन्याचा मसाला अर्थात हळद ही फक्त आपल्या जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरला जात नाही तर तो त्वचेशी निगडित असंख्य समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी देखील आमची मदत करतो. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबतच आपण फेस पॅक म्हणून देखील हळदीचा वापर करतो.” मात्र, आपल्या त्वचेवर किंवा चेहऱ्यावर हा हळदीचा लेप लावताना अनेक जण हमखास काही चुका करतात. या चुका नेमक्या कोणत्या? आणि त्या कशा टाळाव्यात? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

१) अन्य अनावश्यक घटक मिसळणं

हळद हा स्वतः चा सर्व दृष्टीने एक अत्यंत जबरदस्त आणि गुणकारी पदार्थ आहे. मात्र, तुम्ही हळदीचा लेप करताना त्याच्याबरोबर आणखी कोणकोणते पदार्थ मिसळता हे सर्वात महत्त्वाचं आहे. सामान्यतः हळदीत मिसळण्यासाठी गुलाबपाणी, पाणी आणि दूध या ३ पदार्थांना लोक सर्वधिक पसंती देतात. दरम्यान याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना राखी आहूजा म्हणतात कि, हळदीत जर आपण काही अनावश्यक घटक मिसळले तर मात्र त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन त्यामुळे तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. तसेच, हळदीत अत्यंत सक्रिय असणारा कर्क्युमिन हा घटक हा चांगला दाहप्रतिरोधक (अँटीइंफ्लामेंट्री) एजंट आहे.”

२) लेप जास्त वेळासाठी त्वचेवर ठेवणं

तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर/त्वचेवर हळदीचा लेप किती वेळासाठी लावून ठेवता? या प्रश्नामागचं कारण असं कि, कोणताही फेसपॅक हा २० मिनिटांच्या आत काढून टाकणं आवश्यक आहे आणि हळदही त्याला अपवाद नाही हे लक्षात घ्यायाला हवं. कारण, तुम्ही जर २० मिनिटांपेक्षा जास्त वेळासाठी हळदीचा फेसपॅक लावून ठेवलात तर तुमच्या चेहऱ्यावर पिवळे ठिपके/डाग दिसू शकतात. त्याचप्रमाणे अति प्रमाणात हळदीचा वापर केल्याने चेहऱ्यावर मुरुमं देखील येण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही हळदीचा लेप लावलात कि वेळेकडे लक्ष असू द्या.

३) फेसपॅक काढल्यानंतर चेहरा स्वच्छ न धुणं

आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये घाईघाईत आपल्याकडून काही चुका तर होत नाहीत ना? ह्याची काळजी घ्या. ह्यात हमखास होणारी चूक म्हणजे फेसपॅक काढल्यानंतर चेहरा स्वच्छ न धुणं. आपल्या चेहऱ्यावरून किंवा त्वचेवरून हळद काढून टाकल्यानंतर आपण थंड किंवा साध्या पाण्याने तो व्यवस्थित स्वच्छ धुणं आवश्यक आहे. यावेळी चेहऱ्याच्या कोपऱ्यांकडे किंवा दुर्लक्षित भागांकडे विशेष लक्ष असू द्या. त्याचप्रमाणे, तुमचा चेहरा/त्वचा स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर एखादी लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम जरूर लावा.

४) साबणाचा वापर

स्किनकेअर रुटीनमध्ये हळदीचा वापर करताना होणारी आणखी एक मोठी चूक म्हणजे फेसपॅक काढल्यानंतर चेहरा धुताना साबणाचा वापर करणं. ही चूक टाळाच. त्याचप्रमाणे, फेसपॅक काढल्यानंतर किमान २४ ते ४८ तासांसाठी तरी साबणाचा वापर करू नका.

५) असमान पद्धतीनं लेप लावणं

अनेक जण हळदीचा फेसपॅक किंवा लेप लावताना बऱ्याचदा तो घाईघाईत कमी-जास्त प्रमाणात लावतात, ही आणखी एक हमखास होणारी चूक. यामुळे बऱ्याचदा आपल्या चेहऱ्याचा किंवा त्वचेचा एखादा भाग दुर्लक्षित राहतो आणि म्हणूनच त्याचा चांगला रिझल्ट दिसत नाही. तसंच कमी जास्त प्रमाणात लेप लावला गेला कि तो अगदी सहजरित्या जाणवतो. एखादा पॅच जास्त पिवळा दिसतो. म्हणूनच हळद लावताना त्याचा एक सामान आणि पातळ असा थर लावावा. यावेळी, आपल्या मानेभोवतीचा भाग विसरू नका.