आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं कि संधिवाताचा (Arthritis) त्रास हा फक्त वयस्कर लोकांनाच होतो. त्यामुळे, वयानुसार आपल्या प्रत्येकालाच या समस्येला, त्रासाला सामोरं जावंच लागणार आहे. परंतु, आपल्यापैकी अनेकांचा हा समज खरंच १००% योग्य आहे का? कारण, आपल्या आजूबाजूला अशी बरीच ज्येष्ठ मंडळी आपण पाहतो ज्यांची सांधेदुखीबाबत कोणतीही तक्रार नसते. म्हणूनच आपण लक्षात घ्यायला हवं कि, निव्वळ वाढतं वय ही संधिवाताची समस्या उद्भवण्यामागचं एकमेव कारण नाही. मग संधिवात किंवा सांधेदुखीसारख्या या आजारासाठी अन्य कोणकोणती कारणं असू शकतात? जाणून घेऊया..

आपली सध्याची जीवनशैली हे या समस्येमागचं प्रमुख कारण मानलं जातं. आपल्या बदलत्या जीवशैलीने आपल्याला दिलेल्या विविध शारीरिक समस्यांपैकी कमकुवत हाडं आणि सांध्यांची समस्या सर्वात मोठी समस्या आहे. मात्र, आपल्याला होणारा हा त्रास टाळणं देखील आपल्याच हातात आहे. तुमच्या काही चुकीच्या सवयी टाळून तुम्ही सांधेदुखीच्या त्रासातून मुक्त होऊ शकता. म्हणूनच, आज आपण अशा ५ चुकीच्या सवयींबाबत जाणून घेणार आहोत ज्या टाळल्या नाहीत तर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

१) धूम्रपान

धूम्रपान केल्याने आपल्या शरीराच्या टिश्यूजमध्ये एक प्रकारचे अणू तयार होतात ज्याला फ्री रॅडिकल्स म्हणतात. तंबाखूचे सेवन हे केवळ आपल्या फुफ्फुसांसाठीच नव्हे तर हाडांसाठी देखील हानिकारक आहे. तंबाखूचे सेवनाने आपल्या शरीरातील हाडांची घनता कमी होते. शरीरात तयार होणारे हे फ्री रॅडिकल्स आपली हाडं तयार करणाऱ्या पेशींना मारतात. तसेच धुम्रपानामुळे स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉलच्या (Stress Hormone Cortisol) निर्मितीत वाढ होते आणि कॅल्सीटोनिन हॉर्मोनची (Hormone Calcitonin) निर्मिती कमी होते. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. कारण, कॉर्टिसॉल हे बॉन स्टोकमध्ये (Bone Stock) घट करतात तर दुसरीकडे कॅल्सीटोनिन हा बोन स्टोकचं योग्य प्रमाण कायम ठेवण्यास मदत करतात. त्याचतच तुमचा कोणताही अवयव आधीपासूनच फ्रॅक्चर असेल तर धूम्रपान केल्याने तुमच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊन ते बरं होण्याची प्रक्रिया मंद होते.

२) सतत बैठं काम

सतत बैठं काम असणाऱ्या लोकांना हाडांची झीज होण्याचा धोका अधिक असतो. आपल्या शरीराची योग्य हालचाल होणं आवश्यक आहे. स्नायूंच्या आकुंचनामुळे आपली हाडं मजबूत होतात. म्हणूनच, हाडांच्या आरोग्याचा विचार करायचा झाला तर व्यायाम करणं अत्यंत आवश्यक ठरतं.

३) जास्त प्रमाणात मद्यपान

अल्कोहोलमुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल हॉर्मोनचे (Hormone Cortisol) उत्पादन वाढते ज्यामुळे हाडांतील साठा कमी होतो. अल्कोहोलमुळे आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची (Testosterone and Estrogen) पातळी देखील कमी होते. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरतं. कारण, हे हार्मोन्स खरंतर आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

४) मिठाचं अतिरिक्त प्रमाण

जास्त प्रमाणात मिठाचं सेवन आणि हाडांची घनता कमी होणं याचा थेट परस्पर संबंध आहे. जसं आपल्या शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढतं तसं आपलं शरीर लघवीवाटे ते शरीराबाहेर टाकतं. त्यामुळे, दर दिवशी फक्त १ ग्रॅम मीठ जास्त खाल्ल्याने दर वर्षाला प्रौढ महिलांची हाडांची घनता १ टक्क्याने कमी होते. म्हणूनच दररोज २,३०० मिलीग्रामपेक्षा कमी मिठाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तर बहुतेक प्रौढांनी दिवसाला १,५०० मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

५) दिवसभर घरातच राहणं

आपल्या हाडांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी Vitamin D आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी नसेल तर आपली हाडं बारीक आणि ठिसूळ होऊ शकतात. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी तुमच्या शरीराला सूर्यप्रकाश मिळणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जर तुम्ही बाहेर पुरेसा वेळ घालवत नसाल तर तुमच्या शरीरात या पोषकद्रव्याचा अभाव जाणवतो. व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आपण जर दररोज घराबाहेर पडू शकत नसाल तर सॅल्मन मासा, अंडी – अंड्यातील पिवळ बलक या व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारात जरूर समावेश करा.

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे अत्यंत आवश्यक आहेत. परंतु बरेच प्रौढ पुरेसा कॅल्शियमयुक्त आहार घेत नाहीत. परिणाम त्यांच्या शरीराला या दोन्ही पोषक द्रव्यांचे पुरेसे प्रमाण मिळत नाही. म्हणूनच, आपल्या शरीराला ते मिळावं यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स सुरू करण्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला.

आपण हाडांच्या आरोग्याकडे सातत्याने केलेल्या दुर्लक्षामुळे उतार वयात त्याचा परिणाम जाणवू लागतो. म्हणूनच आता तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणाऱ्या या सगळ्या चुकीच्या सवयी टाळा आणि योग्य वेळी एक योग्य जीवनशैली निवडा.

(माहिती साभार : डॉ राजीव वर्मा – एचओडी आणि सल्लागार – जॉइंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक्स, HCMCT मनिपाल हॉस्पिटल, द्वारका नवी दिल्ली : टाइम्स ऑफ इंडिया)