02 December 2020

News Flash

आयुर्वेद : आरोग्यरक्षण – काळाची गरज

नुकताच आपला पाडवा सण होऊन गेला आणि हिंदू नववर्षाचा आरंभ झाला. सण नवचैतन्याचा, सृष्टीत वसंत फुलण्याचा आणि म्हणूनच ह्या काळातील ऋतूला वसंत असे संबोधतात.

– वैद्य तेजस लोखंडे

नुकताच आपला पाडवा सण होऊन गेला आणि हिंदू नववर्षाचा आरंभ झाला. सण नवचैतन्याचा, सृष्टीत वसंत फुलण्याचा आणि म्हणूनच ह्या काळातील ऋतूला वसंत असे संबोधतात.

वसंत ऋतूमध्ये शरीरातील दोषांची स्थिती –
हेमंत-शिशिर महिन्यातील थंड वातावरणात शरीरात गोठलेल्या कफदोष, हा उत्तरायणातल्या सूर्याच्या प्रखर किरणांच्या तेजामुळे वितळून शरीरात कफदोष प्रकुपित होतो. ज्यामुळे या काळात कफदोषापासून जन्माला येणारे अनेक रोग सहज डोके वर काढू पाहतात. गोठाळलेला कफदोष पातळ झाल्यामुळे जठराग्नी ( शरिराची पाचनशक्ती) मंद होतो आणि मंदाग्नी हेच सार्‍या रोगांचे मूळ कारण आयुर्वेद शास्त्र सांगतो.

ऋतू आणि सण परस्पर विचार –
आपल्या हिंदू संस्कृतीत सणांना स्वास्थ्याची जोड आहेच आणि म्हणूनच वसंतातल्या ह्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव वर्ष पारंपरिक पद्धतीने साग्रसंगीत पणे साजरा करतात. ह्याला प्रसाद म्हणून कडूनिंबाची पाने-मोहर, धणे आणि गुळ यांचा विशेष योग तयार करण्याची पारंपारिक प्रथा आहे. यामध्ये गुळ हा चवीने गोड आणि गुणाने उष्ण असल्याने शरीरातील दुष्ट कफाचा नाश करून शरीरस्थ जठराग्नी सुस्थितीत राखायला मदत करतो. पातळ झालेल्या दुष्ट कफामुळे शरीरात अनेक प्रकारच्या कृमींची उत्पत्ती होते. या स्थितीत कृमीनाशक, कफदोषशामक, रक्तशोधन करणार्‍या गुणांचा कडुनिंब वापरण्याचा शास्त्रादेश असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. धणे हे पित्तशामक, दाहशामक, शरीराला थंडावा देणारे आहे. एकंदरीतच हा संयोग नुसताच पाडव्यादिनी न घेता काही दिवस सेवन केला तर वसंतात कफदोषाच्या प्रकोपाने व येणाऱ्या ग्रीष्म ऋतूत पित्तदोषाच्या संचयाने होणार्‍या रोगांची उत्पत्ती सहज टाळता येऊ शकते. दूरदृष्टी ठेवून केलाला हा रोगप्रतिबंधक विचार हा आयुर्वेदाने मानवाला स्वास्थ्य रक्षणासाठी दिलेले हे वरदानच आहे. ह्या योगाचा काढा सुद्धा काही दिवस घेता येतो पण त्यासाठी आपण आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा.

ऋतू आणि साथीचे रोग –
ह्या वसंतात शरीरातील कफ दोष हा प्रकुपित होऊन म्हणजेच पातळ होऊन शरीरामध्ये नाकातून पाणी वाहणे, घश्याला खरखर होणे, कफाचे बेडके पडणे, शिंका येणे, भूक मंदावणे असे लक्षणे दिसू लागतात. सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस मुळे काहूर माजले असून फार चिंताजनक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्याही रोगाच्या महामारी मध्ये आपल्याला श्वास विकारचीच लक्षणे प्रामुख्याने पाहायला मिळतात. म्हणूनच ह्या काळात, आहार – विहार – व्यायाम – दिनचर्या – ऋतुचर्या यांच्या योग्य नियमांचे पालन केल्यास कफ दोषांचे विकार तसेच साथीच्या आजारांपासून संरक्षण करता येऊ शकते.

व्याधी नियंत्रण
हेतू निदान परिवर्जन असे सूत्र आयुर्वेदामध्ये सांगितले आहे म्हणजेच व्याधी होण्यासाठीचे हेतू, कारण ह्यांचा त्याग करणे किंवा घडू न देणे हीच महत्त्वाची चिकित्सा. सध्याच्या महामारीचे हेतू पाहता विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी आपल्या सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली असून त्याचे काटेकोर पालन आपल्या जनतेकडून होणे अत्यावश्यक आहे. ह्या संचारबंदी मध्ये लोकांनी गर्दी मुळात टाळली पाहिजे तसेच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हाथ, पाय, चेहरा हे अंग साबणाने स्वच्छ धुवावे. चेहऱ्यावर स्वच्छ रुमाल, स्कार्फ बांधावा अथवा चांगला मास्क घालावा व वापरून झाल्यानंतर वापरलेले कापड साबणाने स्वच्छ धुवावे. काही कामासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींनी बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीला, वस्तूला उघड्या हाताने स्पर्श करणे टाळावे, त्या साठी हातामध्ये रबरचे ग्लोव्हज वापरावे, वापरून झाल्यानंतर ते क्लिनिकल स्पिरीट किंवा अल्कोहॉल युक्त सॅनिटायजर ने धुवून काळजीपूर्वक फेकून द्यावे.

व्याधीप्रतीकर शक्ती वर्धन.
कफदोष वाढू नये म्हणून ह्या ऋतुमध्ये आपण आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. थोडक्यात आपल्याला वसंत ऋतूचर्याचे पालन केल्यास आपल्याला ह्या काळात होणारे कफदोष निर्मित व्याधी ह्यापासून संरक्षण मिळवता येऊ शकते. तसेच ह्या लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी मध्ये अनेकजण घरीच थांबून जिभेचे चोचले चांगल्याच तरह्येने पुरवत आहेत ज्यामुळे घरबसल्या कफदोष वाढून शरीराचे वजन वाढणे, फाजील चरबी वाढून मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेरॉल सारखे महाभयंकर व्याधी जन्माला घालू शकतात शिवाय घरी बसण्याची सवय नसलेल्यांना मानसिक अस्वस्थता, बैचेन होणे, चिंता वाटणे, ताणतणाव वाढणे ह्यासारखे लक्षणे त्रास देऊ शकतात. यासाठीच आपल्याला घरी थांबून आहारावर योग्य नियंत्रण, दिनचर्या पालन, व्यायाम आदी गोष्टींचे आचरण करावयास हवेच. त्या साठी खाली उपाय योजना आपल्याला सहज करता येऊ शकते.

1. कफदोष दुष्ट व्हायला पाणी हे एक मूळ कारण पाहायला मिळते त्या साठीच पाणी हे चांगले उकळून प्यावे आणि उकळताना त्यामध्ये सुंठ / काळी मिरी / दालचिनी / अख्खे जीरे ह्यासारखे द्रव्ये टाकून पाण्यातील दोष कमी करून पचायला हलके करावे. पाणी साधारण कोमट असेच प्यावे. पाण्याच्या माठात वाळा / चंदन / नागरमोथा / भीमसेनी कापुरचा बारीक तुकडा टाकून पाणी सुगंधी करून प्यावे.

2. ताक हे पचायला हलके, आंबट तुरट रसाचे असून अग्नी दीपक आहे त्यामुळे शरीरातील कफदोष कमी व्हायला अत्यंत गुणकारी आहे. ताकाचे सेवन दुपारी जेवण झाल्यानंतर अवश्य करावे. ज्यांना सर्दी, खोकला, दमा असे विकार आहेत त्यांनी ताक घेऊ नये.

3. मध हे देखील कफदोष कमी करणारे असून कृमी, खोकला, वाढलेले वजन ह्या वर फार उपयुक्त आहे. (मध हा नुसताच खावा किंवा साध्या पाण्यात मिसळून प्यावा, गरम पाण्यात मिसळून कधीच सेवन करू नये हे ध्यानात ठेवावे.)

4. न्याहारी करिता लाह्यांचा चिवडा, भाजणीचे थालीपीठ, भाजलेल्या तांदळाची पेज, तांदळाच्या पिठाचे घावन, ज्वारी – नाचणी पिठाचे सत्व, ज्वारी/ नाचणी/ राजगिरा यांची भाकरी, राजगिरा लाडू, भाज्यांचे घरी केलेले गरम गरम सूप, मूग डाळीचे पराठे, कुळीथ डाळीचे कढण / पिठी ह्यांचे सेवन आवडी नुसार करावे.

5. वांगे, दोडका, पडवळ, सुरण, दुधी, कोवळा मुळा, परवल, लाल भोपळा, कोहळा, बीट, लसूण, कांदा, आले, मेथी, पालक, ह्यांचा अधिक वापर करावा.

6. फोडणी साठी तेल , तूप, मोहरी, जीरा, दालचिनी, लवंग, मिरी, आले, कढीपत्ता, मेथी दाणे, हिंग ह्यांचा वापर करावा. ज्यामुळे शरीरामध्ये कफदोष निर्माण होण्यास प्रतिबंध करतो.

7. ताज्या कैरीचे गूळ घालून केलेले लोणचे, कैरीचे पन्हे, द्राक्ष, डाळिंब, संत्र ह्या सारख्या फळांचा उपयोग करावा.

8. अंघोळ करताना सर्वांगाला उटणे किंवा घरातच मसूर, मूग डाळींचे पीठ समप्रमाणात घेऊन त्यात संत्रीच्या सालींचे चूर्ण, वेखंड टाकून अंगाला घासून मग अंघोळ करावी. शरीरातील कफदोष पातळ होऊन वजन ही कमी व्हायला मदत होते तसेच रक्त अभिसरण सुधारून त्वचा कोमल, निरोगी राखण्यास मदत होते.

9. सकाळी अंघोळ झाल्यावर आणि रात्री झोपताना दोन्ही नाकपुडी मध्ये साजूक तुपाचे 2 – 2 थेंब कोमट करून टाकावे किंवा बोटाने नाकपुडी मध्ये लावावे.

आरोग्य रक्षणासाठी विशेष काळजी –
1. फ्रिज मधले गार पाणी, शीतपेय, आइस्क्रीम, दही, कच्चे अन्न – सलाड, मोड आलेले कडधान्य, मैद्याचे पदार्थ – पाव, ब्रेड, बिस्कीट इ. , चिकट पदार्थ – चीज, मेयॉनिज इ., आंबवलेले पदार्थ उदा. इडली, मेदू वडा, डोसा प्रकर्षाने टाळाव्यात.

2. दुपारी झोपणे टाळावे जेणेकरून शरीरामधील कफ आणि पित्त दोष वाढणार नाही.

3. घरच्याघरी साधे सोप्पे व्यायाम करावे. पवनमुक्तासन, नौकासन, पद्मासन, वज्रासन, सूर्य नमस्कार, प्राणायाम सारखे सोप्पे आसन प्रकार करता येऊ शकतात. (ज्यांना पाठ, कंबर आदी सांधी दुखी असेल त्यांनी आपल्या जवळच्या वैद्याचा सल्ला अवश्य घ्यावा.)

4. वातानुकूलित यंत्रणा चा वापर सुद्धा कटाक्षाने टाळावा.

5. घरात पाळीव प्राणी असल्यास त्यांना बाहेर फिरवताना त्यांच्या तोंडाला ही मास्क बांधावा जेणेकरून बाहेर जमिनीवर किंवा एखादी वस्तू हुंगताना नको असलेले इन्फेक्शन सहज टाळता येऊ शकेल.

6. आवळा व आवळ्याचे पदार्थ जसे की च्यवनप्राश, मुरंबा, कँडी, सुपारी, लोणचे ह्याचा वापर करावा. व्याधी प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवळा हा फारच गुणकारी आहे.

7. घरामध्ये संध्याकाळी धूप करावा. त्या मध्ये नारळाची करवंटी – शेंडी, कांदा लसूण ह्यांची टरफले, सुकलेला लिंबाचा पाला, निलगिरीचा पाला अथवा तेल, वेखंड, लवंग, भीमसेन कापुर आदी गोष्टींचा वापर करू शकता.

8. तज्ज्ञांच्या सल्ल्याने ज्येष्ठमध, वेखंड, गुळवेल, पिंपळी, आवळा अश्या द्रव्यांचा काढा घरच्याघरी तयार करून गरम गरम घेतल्यास कफदोष तर कमी व्हायला मदत होतेच पण व्याधी प्रतिकार शक्ती वाढवायला ही मदत होते.

लॉक डाऊन काळात आरोग्यरक्षण गरजेचे –
लॉक डाऊन हे सगळ्यांना सक्तीची सुट्टी मिळाल्या सारखी झाली आहे. कारण सुट्टी तर आहेच पण बाहेर जाता येत नाही, फिरायला जाता येत नाही, घरी काम ही होत नाही, आराम तर अजिबातच नाही कारण अख्खा दिवस मोबाईल वर राहून शरीराचा, मेंदूचा , आपल्या कर्मेंद्रियांचा, आपल्या ज्ञानेंद्रिंयांचा , मनाचा ताण वाढवत आहोत. घरीच थांबून जिभेवर ताबा न ठेवता शरीराचं वजन वाढवत आहोत आणि जिथे हे संतुलन शरीराचं आणि मनाचं बिघडायला लागते तिथे अनेक व्याधी ज्याला लाईफ स्टाईल डिसाॅर्डर म्हणता येतील, असे जन्म घ्यायला लागतात. त्यामुळे घरात बसून असताना नियमित खाणे, योग्य पथ्यकर खाणे, पाण्याचा अत्यावश्यक मारा कमी करणे, साधे सोप्पे व्यायाम करणे आणि ह्याच सोबत मनाला प्रसन्न करणारे आपले छंद जोपासा, वाचन – लिखाण – चित्रकला आदी कला जोपासा, शारीरिक हालचाल होईल असे घरच्याघरी गेम्स खेळा, घरातील आवश्यक साफ सफाई करा, इंटरनेट वरून चांगले व्हिडिओ बघा अथवा विकिपीडिया वर चांगले नवनवीन विषयांचा अभ्यास करा.

साथीचे विकार / ऋतु बदल होत असताना मधल्या ऋतु संधिकालात निसर्ग नियमाने आपल्याला देखील आपल्या आहार, विहार, दिनचर्या ह्यामध्ये आवश्यक तो बदल करणे गरजेचे आहे जेणेकरून आपण अनेक व्याधी होण्यापासून सुरक्षित राहू शकतो अथवा झाल्यास व्याधी बल हे अल्प राहण्यास उपयोगाचे ठरू शकते. वरील लेखात कोणत्याही चिकित्सेचा स्वतःवर उपयोग करताना आपल्या / जवळील वैद्यांच्या सल्ल्याने करावा. स्वतःवर उपचार करणे म्हणजेच नकळत व्याधी वाढवण्याचा एक प्रयत्न असू शकतो.

( लेखक आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ आहेत. drtejus.lokhande@gmail.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 1:56 pm

Web Title: ayurvedic helath protection is need of time nck 90
Next Stories
1 मुतखड्यावर करा घरच्याघरी आयुर्वेदिक उपाय
2 साखरेविना घरीच्या घरी करा बदाम बर्फी
3 Coronavirus : मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांनो सावधान!
Just Now!
X