– वैद्य विजय कुलकर्णी

चेहऱ्यावर मुरुमे, पुटकुळ्या येण्याची तक्रार विद्यार्थीदशेत अनेक जण करतात. असे का होते? त्यावर काही उपाय आहे की नाही, असे अनेक प्रश्न या त्रासाला कंटाळलेल्या व्यक्ती वारंवार विचारतात. आपला चेहरा हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वपूर्ण घटक असल्याने अशा तक्रारींबद्दल विशेष जागरूकता आढळते. आयुर्वेद शास्त्रात या तक्रारींच्या मूळ कारणांचाही विचार केला आहे. ‘सुश्रुत’ या आयुर्वेदीय विद्वानाने चेहरा ‘दूषित’ करतात म्हणुन मुरुम, पुटकुळ्या यांना ‘मुखदूषिका’ असे नाव दिले आहे. वात, पित्त आणि कफ हे तीन दोष आपल्या शरीराचा कारभार चालवतात. वरील तीन दोषांपैकी एखादा दोष वाढल्यास तो शरीरात सात धातूंपैकी कोणाला तरी दूषित करतो आणि व्याधी होतात. चेहऱ्यावर मुरुमे पुटकळ्या या कफ, वायू आणि रक्त या तीन घटकांमध्ये विकृती निर्माण झाल्याने येतात. रक्तदृष्टीमुळे हे होते. याची कारणे आपल्या आहार, विहारामध्येच दडलेली असतात. त्या कारणांचा विचार येथे करणे आवश्यक आहे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
How to choose a perfectly ripe pomegranate with expert tips
रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

कारणे
सध्याच्या तथाकथित धावपळीच्या युगामध्ये आपल्या आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. सातत्याने तिखट, मसालेदार, आंबट, खारट असे पदार्थ खाणे, आहारात दह्य़ाचा अतिप्रमाणात वापर, तंबाखू, धूम्रपान इत्यादी व्यसने चेहऱ्यावर पुटकुळ्या येण्यास कारणीभूत ठरतात. सततचे जागरण, अतिचहापान, पोट साफ नसणे हे देखील मुखदूषिकांचे महत्त्वाचे कारण आहे. चेहऱ्यावर लहान-मोठे फोड येतात. त्यांचा आकार कमी-जास्त होतो. त्यामधून कधी कधी पिवळा, पांढरा असा पू यांसारखा पदार्थ येतो. हे फोड हाताने फोडण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे मग त्या फोडाच्या ठिकाणी चेहऱ्यावर डाग राहतात आणि चेहरा अधिकच विद्रूप होतो. तरुणवर्ग सौंदर्याच्या बाबतीत विशेष जागरूक असल्याने बऱ्याचदा बाजारामध्ये उपलब्ध असणारी मलमे, औषधे यांचा कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापर केला जातो. त्यामुळेदेखील ही समस्या अधिक वाढते. त्यामुळे या त्रासापासून मुक्त होण्यासाठी औषधांच्या दुकानांत जाणे किंवा अन्य कोणीतरी दिलेल्या माहितीच्या आधारे उपचार करणे टाळावे. वैद्यकीय सल्ल्यानुसारच उपचार घ्यावेत.

उपचार
उपचारांतील प्रमुख भाग म्हणजे रोगाच्या कारणांना दूर ठेवणे. त्यामुळे वर सांगितलेल्या सवयी सोडण्याचा प्रयत्न करावा. आहारात त्यानुसार बदल करावेत. असा त्रास होणाऱ्यांचे पोट साफ होत नसल्यास ती तक्रारही आयुर्वेदीय उपचारांनी दूर करता येते. यासाठी त्रिफळा चूर्ण योग्य मात्रेत वैद्यकीय सल्ल्याने रात्री झोपण्यापूर्वी घेणे हे फायदेशीर ठरते. कामदुधा, गुलकंद अशी काही औषधेही त्यावर उपयोगी पडतात. त्रिफळाच्या काढय़ाने चेहरा धुतल्यास फायदा होतो. चंदन, वाळा इतर काही वनस्पतींपासून तयार केलेल्या लेपांचाही फायदा चेहऱ्यावरील या मुरूम पुटकळ्यांसाठी होतो. आयुर्वेदातील रक्तमोक्षण विरेचन अशा पंचकर्माचाही उपयोग या त्रासाची तीव्रता अधिक असेल तेव्हा होतो. अर्थात ही पंचकर्मे वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावी लागतात.

(लेखक आयुर्वेद चिकित्सक आहेत. ayurvijay7@gmail.com )