केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी अशा राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आठ राज्ये व चार केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य मंत्रालयाशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या योजनेनुसार १० कोटी कुटुंबांना प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचा विमा कवच मिळणार आहे.

दिल्ली, ओडिशा, पंजाब व पश्चिम बंगाल या चार राज्यांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या राज्यांशी चर्चा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. सामंजस्य करारानुसार योजनेच्या अंमलबजावणीत केंद्र व राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेशांची भूमिका ठरविण्यात आली. जगातील ही सर्वात मोठी योजना असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी स्पष्ट केले. या योजनेनुसार देशभर कोठेही लाभार्थीना या सेवेचा लाभ घेता येईल.

योजना काय?

  • दहा कोटी गरीब कुटुंबांना प्रतिवर्षी पाच लाखांचे विमा कवच
  • ग्रामीण भागातील ८ कोटी गरीब तर शहरी भागातील २.३३ कोटी कुटुंबांना लाभ
  • रोकडरहित व कागदपत्रांखेरीज लाभ सरकारी व ठरावीक खासगी रुग्णालयांमध्ये सेवा उपलब्ध