बाबा रामदेव यांच्या पतंजली उत्पादनांची मागच्या काही काळात बाजारात जोरदार चर्चा आहे. त्यांनी केलेल्या जहिराती आणि त्यांच्या उत्पादनांची मध्यमवर्गात असलेली प्रतिमा यांमुळे त्यांच्या उत्पादनांचा खपही वाढला असल्याचे दिसते. यामुळे बाजारातील मोठ्या ब्रँडसनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला. पतंजलीती हीच उत्पादने आता महत्त्वाच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर मिळू शकणार आहेत. याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी पतंजलीच्या अधिकाऱ्यांनी केली होती, मात्र आज त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. पतंजलीची उत्पादने आता अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, ग्रोफर्स, बिगबास्केट, शॉपक्लूज, नेटमेडस या ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवर उपलब्ध होणार असल्याची माहिती बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत बोलताना बालकृष्ण म्हणाले, सध्या ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन पतंजलीने व्यवसायाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावेळी बाबा रामदेव म्हणाले, नफेखोरी हा कंपनीचा एकमेव उद्देश कधीच नव्हता आणि यापुढेही नसेल. तसेच येत्या ५० वर्षात पतंजलीला पूर्ण जगात आपले स्थान निर्माण करायचे असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या १० ते १२ वर्षात कंपनी देशात क्रमांक १ वर असेल आणि येत्या काळात १ ते २ हजार करोड रुपयांची उत्पादने विकण्याचे कंपनीचे उद्दीष्ट असल्याचेही त्यांना यावेळी सांगितले.

याआधी पतंजलीने आपल्या http://www.patanjaliayurved.net वेबसाइटवरुन आपल्या उत्पादनांची विक्री केली होती. मात्र आता इतर शॉपिंग वेबसाइटसशी करार केला असून ही विक्री आणखी सोपी होणार आहे. मी आणि बालकृष्ण हरिव्दारमधील असून आम्हाला येत्या ३ वर्षात ‘हरिव्दार ते हर व्दार’ असा आमचा नारा असेल असेही बाबा रामदेव यावेळी म्हणाले. सध्या ५ कोटी लोक इंटरनेटवर पतंजलीला सर्च करतात. त्या सगळ्यांसाठी ही अतिशय आनंदी बातमी ठरेल असेही बाबा रामदेव यावेळी म्हणाले.