बाबा रामदेव यांच्या पतंजली या आयुर्वेद कंपनीमध्ये मेगा भरती होणार आहे. देशभरात ५० हजार पदांवर नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनीने नुकत्याच केलेल्या एका जाहिरातीवरुन हे स्पष्ट झाले असून देशात विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यात पतंजलीची उत्पादने प्रत्येक जिल्ह्यात घेऊन जाण्यासाठी सेल्समनची पदे भरण्यात येणार आहेत. एका जिल्ह्यासाठी ४० ते ५० सेल्समनची एकावेळी भरती करण्यात येईल. या सेल्समनला पतंजली ब्रँडअंतर्गत येणाऱ्या किराणा, खाण्याचे पदार्थ, सौंदर्यप्रसाधने, घरगुती वस्तू तसेच आस्था अशा विविध गोष्टींसाठी मार्केटींग करावे लागणार आहे.

पात्रता

किमान १२ वी पास असावी. याशिवाय बी.ए, एम.ए आणि एम.बी.ए असलेल्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याबरोबरच ज्यांना फास्ट मुव्हींग कन्झ्युमर गुडस सेक्टरमधील एक किंवा दोन वर्षांचा अनुभव आहे त्यांना पतंजलीकडून प्राधान्य देण्यात येईल.

मानधन

या पोस्टसाठी ८ ते १५ हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल असे कंपनीने सांगितले आहे. उमेदवार कोणत्या शहरात राहतो त्यानुसार हा पगार बदलेल. तसेच उमेदवाराचे शिक्षणही यामध्ये ग्राह्य धरले जाईल.

निवड आणि प्रशिक्षण

२३ ते २७ जून दरम्यान देशभरात या पदांच्या निवडीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहेत. मात्र यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असल्य़ाचे सांगण्यात आले आहे. या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख २२ जून आहे. नोकरी देणारे फसवे लोक आणि एजंटपासून सावध राहण्यासाठी अधिकृत समन्वयकांशी संपर्क करा असे आवाहन कंपनीने केले आहे.