24 January 2020

News Flash

बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काय कराल?

फक्त सौम्यच नव्हे तर, बाळांच्या त्वचेची नाजूक व मुलायमपणे काळजी घेतील अशा उत्पादनांना आईची पहिली पसंती

डॉ. संजय नातु

बालपणी आपल्या त्वचेमध्ये वेगाने बदल घडून येत असतात. लहानग्या बाळाची त्वचा, २-३ वर्षांच्या बाळाची त्वचा व संपूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीची त्वचा यामध्ये आमूलाग्र फरक असतो. जन्मल्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये सर्वसामान्यतः होणारे हार्मोन्समधील बदल किंवा नाजूक त्वचाछिद्रांमुळे तसेच काही संसर्गामुळे त्वचेवर लाल चट्टे येणे, जळजळ होणे असे प्रकार होत असतात. लहान बाळांच्या त्वचेतील पाण्याच्या प्रमाणात वेगाने चढ-उतार होत असतात, त्यांच्या त्वचेमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक कमी असतात, त्यामुळे त्यांची त्वचा बऱ्याचदा शुष्क व कोरडी असते आणि ते आपल्याला जाणवतदेखील नाही. लहान मुलांच्या त्वचेमधून मॉइश्चरायझर कमी होत जाण्याचा वेग मोठ्यांच्या त्वचेपेक्षा दोन पट जास्त असतो. या सर्व कारणांमुळेच लहान बाळांच्या त्वचेची काळजी वेगळ्याप्रकारे घेतली जाणे गरजेचे असते.

ऋतू व हवामान यामध्ये बदल झाले तरी तुमच्या बाळाची त्वचा निरोगी व सतेज राहावी यासाठी मदत करू शकतील अशा काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुमच्या बाळाला आंघोळ करताना मजा वाटत असेल तर अगदी निःशंक होऊन बाळाच्या आंघोळीचे प्रमाण वाढवा. यामुळे बाळाला येणारा घाम स्वच्छ होत राहील. पण आंघोळीचे पाणी कोमट आहे याकडे लक्ष द्या. बाळाच्या आंघोळीचे पाणी जास्त गरम नको व जास्त थंडदेखील नको. बाळासाठी आंघोळ ही आरामदायी असायला हवी. बाळाची आंघोळ हा आई-बाबा व बाळ यांच्यादरम्यानची जवळीक अधिक जास्त घट्ट करण्याची चांगली संधी असते. आंघोळीमुळे बाळ शांत होते, आंघोळीनंतर बाळाला शांत झोप लागते.

आंघोळ ही नुसते पुसून काढण्यापेक्षा किंवा धुवून काढण्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते व त्यामुळे अनेक फायदे होतात पण त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही खबरदाऱ्या घेतल्या गेल्या पाहिजेत. आंघोळीमुळे बाळ व त्याचे आई-बाबा दोघांनाही मानसिक आरोग्य लाभते. म्हणूनच बाळाच्या आंघोळीसाठी योग्य वस्तूंचा उपयोग केल्यास तुम्ही तुमच्या बाळाची सौम्य व मुलायमपणे काळजी घेऊ शकता.

लक्षात ठेवा, बाळाची त्वचा ३०% जास्त पातळ असते, तिची स्वच्छता राखणे, ती सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे पण ते अतिशय मुलायमपणे केले गेले पाहिजे. म्हणूनच पीएच संतुलित कोमल उत्पादने वापरणे आवश्यक आहे. पॅराबेन फ्री व डाय फ्री क्लीन्जर्स सौम्य असतात आणि त्वचेला जराही न दुखावता मुलायमपणे स्वच्छ करतात.

एखादे उत्पादन निवडताना त्यामध्ये नेमके कोणते घटक पाहिले पाहिजेत:

१. सौम्य व मुलायम

२. त्वचा व डोळ्यांना त्रासदायक नसावे.

३. त्यामध्ये ऍलर्जिक शक्यता नाही हे क्लिनिकली सिद्ध झालेले असावे.

४. पीएच संतुलित फॉर्मुला जो त्वचेच्या सौम्य ऍसिडिक पीएचला (५ ते ७ च्या दरम्यान) अडथळा ठरणार नाही.

५. सौम्य सुवास जो त्रासदायक ठरणार नाही.

बाळांच्या त्वचेची नीट काळजी न घेतली गेल्यास त्याचे तात्पुरते व दीर्घकालीन, गंभीर परिणाम होऊ शकतात. उष्णतेचे लालसर चट्टे, नॅपी रॅश, पाळण्यात खूप वेळ राहिल्याने उठणारे चट्टे, ऍटॉपिक एक्झिमा असे त्रास होऊ शकतात. यापैकी बऱ्याच त्रासांचे मुख्य कारण जंतूंमुळे होणारे संसर्ग, वातावरणातील बदल, घाम असते. हे सर्व टाळण्यासाठी बाळांच्या त्वचेची नीट काळजी घेणे गरजेचे असते.

( लेखत पुण्यातील कन्सल्टिंग पेडिऍट्रिशिअन व पेडिऍट्रिक्सचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत )

First Published on April 22, 2019 6:09 pm

Web Title: baby skin care for your perusal
Next Stories
1 स्पोर्ट युटिलिटी वाहनासाठी महिंद्रा-फोर्डची हातमिळवणी
2 धोकादायक पासवर्डची यादी जाहीर, तुमचा पासवर्ड यात नाही ना?
3 हापूसचे पोर्तुगाल कनेक्शन
Just Now!
X