स्मार्टफोन व टॅब्लेट यांचा मुलांनी जास्त वापर केल्यास झोपेवर त्याचा वाईट परिणाम होतो, असे किशोरवयीन मुलांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. ही मुले रोज दोन तास मोबाइल फोन वापरणाऱ्यांपकी होती. त्यांच्यात मोबाइल फोन वापरण्यामुळे अनिष्ट परिणाम दिसून आले. झोपविषयक तज्ज्ञांच्या मते किशोरवयीन मुलांना रोज रात्री नऊ तास झोप आवश्यक असते. सात तासांपेक्षा कमी झोप ही हानिकारक मानली जाते. अमेरिकेतील सँडियागो विद्यापीठाच्या संशोधकांनी किशोरवयीन मुलांबाबत मिळवलेल्या महितीच्या आधारे हे निष्कर्ष काढले आहेत. एकूण तीन लाख साठ हजार मुलांची माहिती यात गोळा करण्यात आली होती. आठवी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश होता. दुसऱ्या एका पाहणीत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या मुलांना ते किमान किती तास झोप घेतात हे विचारण्यात आले होते. २०१५ पाहणीनुसार ४० टक्के मुलांना सात तासांपेक्षा कमी झोप मिळाली होती. १९९१च्या तुलनेत ५८ टक्के जास्त होते, तर २००९च्या तुलनेत १७ टक्के जास्त होते. हे प्रमाण स्मार्टफोनच्या वापरानंतर वाढतच गेले. स्लीप मेडिसिन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जी मुले जास्त काळ ऑनलाइन घालवतात त्यांच्यात झोपेचे प्रमाण कमी असते. जी मुले दिवसा पाच तास ऑनलाइन असतात त्यांना पुरेशी झोप मिळण्याची शक्यता इतर मुलांच्या तुलनेत ५० टक्के कमी असते. प्राध्यापक जीन ट्वेग यांच्या मते स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांमध्ये झोपेचे प्रमाण कमी होत गेले. अमेरिकेत २००९ मध्ये स्मार्टफोनचा वापर वाढला होता. त्यामुळे सात तासांपेक्षा कमी झोप मिळत असलेल्या मुलांची संख्या २००९ ते २०१५ या काळात १७ टक्के वाढली.

स्मार्टफोन व टॅब्लेट यांच्यातून निघणाऱ्या प्रकाश व विद्युत चुंबकीय लहरी झोपेचे चक्र बिघडवतात. त्यामुळे ही मुले आठवडाअखेरीस जास्त झोपतात. झोपण्यापूर्वी मोबाइल फोन जवळ बाळगू नये, त्याचबरोबर संगणकावर जास्त काळ काम करणे टाळावे असा इशारा देण्यात आला आहे.