दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची निर्मीती करणारी कंपनी बजाज ऑटो ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना दिसत आहे. बजाज ऑटोच्या नोव्हेंबर महिन्यातील एकूण विक्रीचा विचार करता गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झालीये. दुसरीकडे, दमदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची नोव्हेंबरची विक्री ६ टक्क्यांनी घसरली आहे.

यंदा बजाज ऑटोच्या ४,०६,९३० गाड्यांची विक्री नोंदविण्यात आली. तर, एका वर्षापूर्वी याच महिन्यापर्यंत काळातील कंपनीची विक्री ३,२६,८१८ युनिट नोंदविण्यात आली होती. कंपनीकडून देण्यात आलेल्या मासिक आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात कंपनीने भारतीय बाजारपेठेत 31 टक्के अधिक म्हणजे २,३४,८१८ गाड्यांची विक्री केली. तर नोव्हेंबर २०१७ मध्ये हा आकडा १,७९,८३५ इतका होता.

यादरम्यान, कंपनीचा निर्यात दरही १७ टक्क्यांनी वाढला असून १,४६,६२३ युनिटवरुन १,७२,११२ युनिट झाला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एकूण ३,४६,५४४ मोटरसायकलची विक्री केली, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये २,६३,९७० गाड्या विकल्या होत्या.

दुसरीकडे, मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर महिन्यातील विक्रीचा विचार करता रॉयल एनफिल्डची विक्री ६ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने ७०,१२६ गाड्यांची विक्री केली होती. तर, यंदा नोव्हेंबर महिन्यात केवळ ६५,७४४ बाइक विकल्या गेल्यात. या दरम्यान कंपनीचा निर्यात दरही ६९ टक्क्यांनी घसरून ७१८ युनिटसवर राहिला. गेल्या वर्षी कंपनीने याच महिन्यात २,३५० वाहनांची निर्यात केली होती.