यावर्षी लाँच होणाऱ्या बहुप्रतिक्षित गाड्यांपैकी एक म्हणजे ‘बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कुटर’. गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी कंपनीने ही स्कुटर सादर केली होती, अखेर उद्यापासून अर्थात १४ जानेवारीपासून या स्कुटरच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे या स्कुटरची सर्वप्रथम विक्री पुणे आणि बंगळुरूमध्ये होईल. त्यानंतर अन्य मेट्रो शहरांमध्ये ही स्कुटर विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.

ही बजाजची पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर असून Urbanite ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर इलेक्ट्रिक प्रकारात सादर केलीये. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासूनच कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पामध्ये या स्कूटरचं प्रोडक्शन घेण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय बाजारात चेतकची टक्कर Ather 450 आणि Okinawa Praise यांसारख्या स्कूटरशी होईल. नव्या चेतक इलेक्ट्रिकमध्ये Eco आणि Sport मोड देण्यात आले आहेत. या स्कूटरमध्ये कंपनीने अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) सारख्या फीचर्सचा समावेश केला आहे. चेतक आता जुन्या काळातून बाहेर आली असून पूर्णतः आधुनिक झालीये.

या स्कूटरमध्ये फिक्स्ड टाइप बॅटरीचा वापर केला जाईल, म्हणजेच यातील बॅटरी पोर्टेबल नसेल. विविध सहा रंगामध्ये ही स्कूटर सादर करण्यात आली आहे. यात lithium-ion बॅटरी देण्यात आली असून स्टँडर्ड 5-15 amp आउटलेटद्वारे चार्ज करता येणं शक्य आहे. मोनोशॉक सस्पेंशन यामध्ये दिलं असून दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आहेत. मल्टी स्पोक अॅलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायर असलेल्या या स्कूटरच्या पुढील बाजूला कंपनीने राउंड शेप हेडलाइट दिले आहेत. इको मोडमध्ये ही स्कूटर 95 किलोमीटरची रेंज, तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस इग्निशन, पुढील बाजूला हेडलँप्सजवळ ओव्हल LED स्ट्रिप यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत. सुमारे तीन दशकांपूर्वीपासून भारताच्या रस्त्यांवर दिमाखात धावणारी बजाज ऑटोची चेतक आता पुन्हा एकदा रस्ते गाजवण्यास सज्ज झाली आहे.

देशात दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. बजाजने चेतक ही प्रसिद्ध स्कूटर पहिल्यांदा १९७२ मध्ये लॉन्च केली होती. सुमारे 34 वर्षे ही स्कूटर देशातील रस्त्यांवर धावत होती. त्यानंतर 2006 मध्ये कंपनीने या स्कूटरची विक्री बंद केली होती. कारण, तोपर्यंत ऑटोमॅटिक स्कूटर्सने बाजारावर कब्जा केला होता. ही स्कूटर सुरुवातीला लॉन्च करण्यात आली त्यावेळी कंपनीने त्याची जाहिरात ‘नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी केली होती, ती खूपच लोकप्रिय झाली होती. तसेच या स्कूटरला कंपनीने महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचे नाव दिले होते. या स्कूटरमध्ये कंपनीने 145 सीसीचे टू स्ट्रोक इंजिन दिले होते. जे 7.5 बीएचपी पावर देत होते तसेच 10.8 एनएमचा टार्क ते निर्माण करीत होते. 1.30 लाख रुपये इतकी या स्कूटरची किंमत असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लाँचिंगवेळीच किंमतीबाबत घोषणा केली जाईल.