बजाजने आपली दमदार बाइक Pulsar NS200 नव्या रंगात आणली आहे. आतापर्यंत केवळ वाइल्ड रेड, ग्रेफाइट ब्लॅक आणि मिराज व्हाइट रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध होती. आता पुन्हा एकदा ही बाइक ‘सिग्नेचर येलो’ या रंगात उपलब्ध असणार आहे. वर्ष 2012 मध्ये सर्वप्रथम कंपनीने पल्सर एनएस200 ला ‘येलो’ रंगातच लाँच केलं होतं, पण त्यानंतर हा रंग बंद करण्यात आला. कंपनीने अधिकृतपणे ‘येलो पल्सर एनएस200’ ला लाँच केलेलं नाही मात्र डीलर्सपर्यंत ही बाइक पोहोचायला सुरूवात झाली आहे.

नव्या रंगामध्ये ही बाइक शानदार दिसत आहे. रंगाव्यतिरिक्त कंपनीने या बाइकमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पल्सर एनएस200 मध्ये 199.5cc, लिक्विड-कूल्ड, 4-वॉल्व्ह, फ्युअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 9500 rpm वर 23.5hp ची पावर आणि 8000 rpm वर 18.3Nm टॉर्क जनरेट करतं. यात 6-स्पीड गिअरबॉक्स आहे.

पल्सर एनएस200 च्या पुढील बाजूला 280mm फ्रंट डिस्क आणि मागील बाजूला 230mm रिअर डिस्क ब्रेक आहे. सिंगल चॅनल एबीएस असलेल्या या बाइकच्या सस्पेंशनच्या बाबत सांगायचं झाल्यास या बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे रिअर मोनोशॉक आहे. बजाज पल्सर एन200 एबीएसची एक्स शोरूम किंमत 1.12 लाख रुपये आहे. कंपनी लवकरच येलो रंगातील ही बाइक अधिकृतपणे लाँच करण्याची शक्यता आहे.