पालेभाज्या, मासे, फळे आणि कडधान्ये यांचा समावेश असलेल्या सकस आहारामुळे हृदयरुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी होत असल्याचा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे.

सकस आहार हा जगभरात आरोग्यासाठी लाभदायक आहार असल्याचे इटलीतील आयआरसीसीएस न्यूरोम संस्थेच्या गिओव्हॅनी दे गायेतानो यांनी सांगितले. या आहारामुळे विविध आजारांचा धोका कमी होतो, त्यामुळेच प्रत्येकालाच असा सकस आहार देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे हृदयरोग असलेल्यांना हा आहार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संशोधकांनी १,१९७ हृदयरुग्णांचा अभ्यास करून हे संशोधन मांडले आहे. युरोपीयन प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन इनटू कॅन्सर (ईपीआयसी) या कर्करोग आणि आहार यांचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सकस आहाराबाबत जनमत चाचणी घेतली. या वेळी या चाचणीत सकस आहाराला दहापैकी नऊ गुण देण्यात आले. मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब हा आजार असलेल्यांना सकस आहार दिल्यास त्यांना असलेला जिवाचा धोका २१ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले. कमी सकस आहार घेणाऱ्यांना जिवाचा धोका अधिक असल्याचेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.

पालेभाज्या, मासे, फळे, कडधान्ये यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील घातक आम्ल नष्ट होऊन रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याचे संशोधक मारिआलॉरा बोनॅसिओ यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)